मुंबई : लोकवाङ्मय गृह प्रकाशनाचे माजी प्रकाशक प्रकाश विश्वासराव यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांना स्मृतिभंशाने ग्रासले होते.
लोकवाङ्मय गृहाशी जोडले जाण्यापूर्वी विश्वासराव हे एका खासगी छापखान्यात काम करत होते. साधारण ऐंशीच्या दशकाच्या मध्यात कवी नारायण सुर्वे यांच्यामुळे ते लोकवाङ्मय गृहाशी जोडले गेले. सुरुवातीला प्रकाश यांनी पुस्तकांची कलात्मक बाजू सांभाळली. ‘महाभारत : एक सूडाचा प्रवास’, ‘साहित्यशास्त्र’, इत्यादी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी लोकवाङ्मयगृहामध्ये प्रकाशक म्हणून जबाबदारी स्वीकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र चरित्र त्यांच्या संकल्पनेतून साकार झाले. प्रकाश विश्वासराव, अशोक मुळे, बीयन चव्हाण, महादेव कोकाटे, सुरेश चिखले यांच्यात घट्ट मैत्री होती. त्यावर आधारित ‘दोस्तायन’ हे पुस्तक चव्हाण यांनी लिहिले होते. विश्वासराव हे २०१५ सालापर्यंत लोकवाङ्मयगृहमध्ये कार्यरत होते.
त्यांच्या मागे एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. ते कांदिवली येथे वास्तव्यास होते. तेथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.