अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला तिचा प्रियकर राहुल राज सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल सिंगचे वकील नीरज गुप्ता यांनी बुधवारी या खटल्यातून आपले वकीलपत्र मागे घेतले. मी मानवतावादी दृष्टीकोनातून माघार घेत आहे. कुणावरही अन्याय होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे हा खटला लढू नये, असे वाटल्याने मी माझे वकीलपत्र मागे घेत असल्याचे नीरज गुप्ता यांनी सांगितले. एखाद्या अशिलाने त्याच्या वकिलाला सर्व प्रकारची माहिती देणे अपेक्षित असते. मात्र, याप्रकरणात मला अंधारात ठेवले गेले आणि खटल्यासंदर्भातील बरीच माहिती मला प्रसारमाध्यमांकडून मिळाल्याचे गुप्ता यांनी सांगितले. राहुल सिंगवर गुन्हा दाखल झाल्यामुळे तुम्ही या खटल्यातून माघार घेतली का, असे विचारण्यात आले असता गुप्ता यांनी गुन्हा दाखल होण्याचा माझा निर्णयाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. कोणत्याही वकिलाला अशा गोष्टी अपेक्षित असतात, असे गुप्ता यांनी म्हटले. पोलिसांनी राहुलविरोधात प्रत्युषाला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अजूनपर्यंत त्याला अटक झालेली नाही. शुक्रवार, १ एप्रिलला गोरेगाव, मोतीलालनगर येथील घरात प्रत्युषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बांगूरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्य़ाचा तपास सुरू आहे.