शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. “प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई गेली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली. यानंतर आता त्यांच्या टीकेला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी”,असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना…सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?” असा प्रश्न दरेकर यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

मुंबई महापालिकेने १० सप्टेंबर रोजी बेकायदेशीर बांधकामाचं कारण देत अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.  यानंतर ही कारवाई थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. दरेकर यांनी मुंबई महापालिकेच्या या करावाईवरून आता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

तर,“ईडीने भाजपा कार्यालयात शाखा उघडली असावी. पण आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या,” असं जाहीर आव्हानही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे.

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीचं पथकाने शोधमोहिम सुरु केली.

“प्रताप सरनाईक हे शिवसनेचे जबाबदार आणि महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याबाबत अशा पद्धतीने सुडाचं राजकारण केलं जातंय ही बाब निंदनीय आहे. ‘ईडी’ने धाड टाकली किंवा काहीही झालं तरीही महाविकास आघाडीचं सरकार पुढील २५ वर्ष टिकणार आहे. आमचं सरकार, आमचे आमदार आणि आमचे नेते अशा प्रकारच्या धाडींमुळे कोणालाही शरण जाणार नाहीत. त्यामुळे अशा धाडी टाकून सरकार बनवता येईल असं ज्यांना वाटतंय, ते मूर्ख आहेत”, अशी टीका राऊत यांनी भाजपावर केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praveen darekar criticized sanjay raut msr
First published on: 24-11-2020 at 13:22 IST