अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून वर्गणी गोळा केला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. त्यामुळे भाजपा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पहिले मंदिर फिर सरकार, असे याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. परंतु सरकार आल्यावर त्यांनी मंदिराचा विषय बासनात गुंडाळून ठेवला. स्वतः राजकारण करायचे आणि भाजपावर राजकीय आरोप करून चर्चेत रहायचे असे त्यांचे धोरण आहे.” असं ट्विट करून प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

तसेच, “संजय राऊत यांची अतिशय दुटप्पी भूमिका आहे. काहीतरी बोलून चर्चेत राहायचं अशा प्रकारचे त्यांचे धोरण दिसत आहे. पहिले मंदिर फिर सरकार, असे याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. परंतु सरकार आल्यावर त्यांनी मंदिराचा विषय बासनात गुंडाळून ठेवला. स्वतः राजकारण करायचे आणि भाजपावर राजकीय आरोप करून चर्चेत रहायचे असे त्यांचे धोरण आहे.” असं दरेकर यांनी ट्विटवर व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.

“आपण म्हणजे लोकं, आपण म्हणजे मुंबईकर, आपण म्हणजे महाराष्ट्र अशा भ्रमामधून अगोदर त्यांनी बाहेर यावं. संजय राऊत यांचं बोलणं आश्चर्चकारक व हास्यास्पद आहे की, चार लाख स्वयंसेवक फिरणार आहेत, त्यामुळे ज्यांनी मंदिरासाठी रक्त सांडलं त्यांचा अपमान होईल. खरं म्हणजे हे दुर्देवी वाक्य आहे. उलट यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल की आज लोक सहभागातून राम मंदिर उभं राहत आहे. जर एखाद्या भांडवलदाराने तिथं पैसे दिले असते तर हे राऊत टीका करायला आले असते व म्हणाले असते की भांडवलदारांच्या पैशातून राम मंदिर आम्हाला मान्य नाही.” अशा शब्दांमध्ये प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

“राम मंदिराच्या विषयात अडथळे आणण्यासाठी शिवसेना व संजय राऊत यांना कोण प्रवृत्त करत आहे?”

तर, चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेकडून आज सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आला आहे.

“’चंदा धंदा है की गंदा है’ मला माहिती नाही. परंतू अयोध्येचा राजा प्रभू श्रीरामाचे मंदिर आता बनत आहे. त्यांच्या मंदिरासाठी लोकांनी बलिदान दिलं आहे, रक्त सांडलं आहे आणि न्यायालयाच्या आदेशाने मंदिर बनत आहे. पंतप्रधानांनी त्याचे भूमिपूजन केले आहे. आता अयोध्येच्या राजासाठी पैसे मागण्यासाठी तुम्ही घरोघरी जाल तर हा राजाचा अपमान आहे व हिंदुत्वाचा देखील अपमान आहे. मला वाटतं रामल्लाच्या नावावर अयोध्येत जे बँक खाते उघडण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वांनीच जे मोठमोठाले दानशूर आहेत देशात ते सर्वजण त्यात पैसे टाकत आहेत. शिवसेनेने देखील १ कोटी रुपये दिले आहेत. असे असंख्य लोकं आहेत. तर मग जे चार लोकं तुम्ही गावागावात पाठवत आहात, कुणाच्या प्रचारासाठी पाठवत आहात? आता हे रामाच्या नावावरचं राजकीय नाट्य बंद करा. राम मंदिर बनत आहे, तर तुम्ही राजकारण थांबवा.” असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin darekar criticized sanjay raut msr
First published on: 21-12-2020 at 19:26 IST