मुंबई : नाट्यवर्तुळात चर्चेची ठरलेली आणि युवा रंगकर्मींच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचे बिगूल वाजले आहे. या स्पर्धेच्या नव्या पर्वाला प्रारंभ लवकरच होत असून नाट्यरसिकांची प्रतीक्षा संपलेली आहे. प्राथमिक, विभागीय अंतिम आणि महाअंतिम फेरी अशा तीन टप्प्यांत ही स्पर्धा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर, विभागीय अंतिम फेरी ही ७ ते १६ डिसेंबर या कालावधीत रंगेल. त्यानंतर ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडण्यासाठी मुंबईत २१ डिसेंबर रोजी दर्जेदार एकांकिकांमध्ये ‘महाअंतिम फेरी’ होईल.

यंदा स्पर्धेला ‘जवाहरलाल नेहरू प्राधिकरण’चे (जेएनपीए) मुख्य प्रायोजकत्व लाभले असून, सॉफ्ट कॉर्नर यांची सहप्रस्तुती आणि केसरी टूर्स हे सहप्रायोजक आहेत. विविधांगी विषयांवर आधारित दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण, कसदार अभिनय, लक्षवेधी ठरणाऱ्या तांत्रिक बाजू आणि ‘अरे आवाज कुणाचा…’ या आरोळीने दणाणलेले व तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात न्हाऊन गेलेले नाट्यगृह पुन्हा एकदा ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्राथमिक व विभागीय अंतिम फेरीत दर्जेदार एकांकिकांमध्ये २१ डिसेंबर रोजी महाअंतिम फेरी होणार असून मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडली जाईल. महाअंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट ३ एकांकिकांचे सादरीकरण २२ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरू प्राधिकरणाच्या उरण येथील सभागृहात होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजाशी निगडित आणि मानवी भावभावनांचा वेध घेणारे विषय, सादरीकरणातील नावीन्य, प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद आणि उत्साहासह ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा यंदाही रंगणार आहे. विविध समस्यांबाबतची तरुणाईची विचारस्पंदने एकांकिकांमध्ये उमटलेली पाहायला मिळतील. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा तरुणाईला नेहमीच आकर्षित करीत आली असून दर्जेदार एकांकिकांमुळे चुरशीची ठरली आहे. त्यामुळे यंदा कोणत्या महाविद्यालयाची एकांकिका ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ ठरणार, याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे.