‘लोकसत्ता इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह’मध्ये गुरुवारी उद्यमींचे मार्गदर्शन

मुंबई : करोनाकाळात बिघडलेले अर्थचक्र  गतिमान होत असताना औद्योगिक प्रगती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांचा परामर्श घेण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात येत आहे. उद्योगांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी निश्चित असा कृती आराखडा या चर्चासत्रातून उपलब्ध होणार आहे. टाटा, महिंद्रा अशा मोठय़ा समूहांचे वरिष्ठ अधिकारी या कॉनक्लेव्हला उपस्थित राहतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन; तसेच टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज, विश्लेषक, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या उद्योगपती-उद्योजकांच्या संघटनेचे सदस्य सहभागी होत आहेत.

महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्टय़ा सर्वात प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. देशातील औद्योगिक उत्पादनाच्या १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळपास ४० टक्के महसूल हा महाराष्ट्रातून मिळतो. स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके  महाराष्ट्राने विविध उद्योगांच्या विकासाचे सारथ्य केले. अनेक मोठे उद्योग-हजारो लघु व मध्यम उद्योग व त्यात काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. करोनाच्या काळात आता अर्थचक्र पुन्हा रुळांवर आणण्यासाठी राज्य सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या व त्यावर उपाय काय या अनुषंगाने गुरुवारी २६ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह- २०२१’मध्ये चर्चा होणार आहे. उद्योगउभारीसाठी महाराष्ट्र शासन आखत असलेली धोरणे, नवउद्योगनिर्मितीसाठी आणि व्यापारवृद्धीसाठी असलेले महाराष्ट्राचे अनन्यसाधारण स्थान याविषयी सरकारच्या वतीने सविस्तर माहिती सादर केली जाईल. एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी काय आवश्यक आहे याविषयी उद्योगधुरीणांकडून सूचना, पायाभूत सुविधांच्या स्थितीचा सविस्तर आढावा असे या बहुसत्रीय कॉन्क्लेव्हचे स्वरूप आहे.

१ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेसाठी..

‘एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठीचा कृती आराखडा’ या विषयावर चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. सच्चिदानंद शुक्ला, ‘ब्लू स्टार’चे व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन, आदित्य बिर्ला समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ अजित रानडे हे सहभागी होणार आहेत.

प्रायोजक

’मुख्य प्रायोजक  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

’ साहाय्यक  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.

’कॉर्पोरेट पार्टनर  कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)