अंधेरी पश्चिम येथील सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेली मुद्रण कामगार वसाहत बांधकाम व्यावसायिकामार्फत पूर्णपणे हलविण्याचा शासनाचा डाव यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. येथील १८५ सरकारी कर्मचाऱ्यांपैकी दीडशे कर्मचाऱ्यांनी अखेर घरे रिक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, तर ३०हून अधिक कर्मचारी याच ठिकाणी वसाहत मिळावी, यासाठी लढा देत आहेत.
मुद्रण कामगारांची सरकारी वसाहत हलवून तेथे उद्योगभवन उभारण्याच्या नावाखाली हा मोक्याचा भूखंड शासनाने ‘आकृती बिल्डर’च्या पदरात टाकला आहे. उद्योगभवन बांधण्याच्या मोबदल्यात बिल्डरला उर्वरित भूखंडाचा विकास करण्याचा तसेच टीडीआर वापरण्यास परवानगी मिळणार आहे. त्यातून तो कोटय़वधी रुपये कमावणार आहे.
हा बांधकाम व्यावसायिक या मुद्रण कामगारांना मानखुर्द येथे वसाहत बांधून देणार आहे. तोपर्यंत या कामगारांनी भाडय़ाने राहावयाचे आहे. त्यासाठी या कामगारांना बांधकाम व्यावसायिकाकडून प्रत्येकी साडेबारा लाख रुपये मिळणार आहेत. त्यानुसार त्यांना करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करायच्या आहेत. स्वाक्षऱ्या झाल्यानंतर अडीच लाख रुपये व उर्वरित दहा लाख रुपये घराची चावी ताब्यात दिल्यानंतर या कामगारांना मिळणार आहेत.
दरम्यान, आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही हे पाहून दीडशे कामगार बिल्डरला शरण गेले. भविष्यात आपल्याला निवासस्थाने मिळतील किंवा नाही, याची त्यांना शाश्वती नाही. मात्र ३०हून अधिक कामगारांनी अजूनही आशा सोडलेली नाही. खासदार गुरुदास कामत यांच्या मदतीने हे कामगार लढा देत आहेत. या कामगारांना मूळ जागेवरच निवासस्थाने हवी आहेत.
शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने १९६२ मध्ये सुमारे २० एकर भूखंड मुद्रण कामगार वसाहत बांधण्यासाठी महसूल खात्याकडून ताब्यात घेतला होता. १९७६ पर्यंत या ठिकाणी १२ इमारती बांधण्यात आल्या. १९७८ मध्ये यापकी एक एकर भूखंड ग्यान केंद्र या खासगी संस्थेला देण्यात आला. (शाळा व खेळाच्या मदानासाठी प्रत्येकी ४००० चौ. मी.) उर्वरित भूखंड नंतर आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांची पाटलीपुत्र गृहनिर्माण संस्था (५७११ चौ. मी.), स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाऊंडेशन (१७२० चौ. मी.), आमदार वसाहत (३४७५ चौ. मी.), नौशाद फाऊंडेशन, डॉ. नीतू मांडके इस्पितळ आणि कामधेनू व्यापारी संकुल यांना वितरित करण्यात आला. शिल्लक राहिलेल्या साडेचार एकर भूखंडावरील १२ इमारती पाडून मुद्रण कामगारांनाच हाकलून मोक्याचा भूखंड पदरात पाडण्यासाठी बिल्डरने हालचाली सुरू केल्या आहेत.
बहुतांश कामगार निवृत्तीकडे झुकले
१९८१ पासून हे कामगार गृहनिर्माण संस्था तयार करून शासनाकडे भूखंड मागत आहेत. परंतु आयएएस-आयपीएस, आमदारांची मागणी मान्य करणाऱ्या शासनाने मुद्रण कामगारांना मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या. कामत यांच्यासह स्थानिक नगरसेवक बाळा आंबेरकर यांनी या कामगारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे ठरविले आहे. सध्या या ठिकाणी राहत असलेले बहुतांश कामगार निवृत्तीकडे झुकले आहेत.