मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये समाजमाध्यमांचा अतिवापर, कार्यालयांमध्ये कामाचा वाढता व्याप, दाम्पत्यामधील तुटलेला संवाद आदी विविध कारणांमुळे पती – पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला असून भावनिक जवळीक साधण्यासाठी अन्य व्यक्तीचा शोध सुरू होतो आणि त्यातून विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. महानगरांमध्ये अशी प्रकरणे वाढत असून दाम्पत्यामध्ये परस्परांवर संशय बळावत आहे. या संशयाची खातरजमा करण्यासाठी आणि जोडीदाराविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी खासगी गुप्तहेर संस्थांची मदत घेण्याकडे कल वाढत आहे.
मोबाइल आणि समाज माध्यमाच्या अती वापरामुळे पती – पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत असून परिणामी, विवाहबाह्य संबंध वाढत असल्याचा दावा स्विफ्ट डिटेक्टीव्ह एजन्सीजच्या संचालिका प्रिया काकडे यांनी नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला. घटस्फोटासाठी केवळ संशय नाही, तर ठोस पुरावे लागतात. त्यामुळेच विवाहबाह्य संबंधांचे पुरावे गोळा करण्यासाठी खासगी गुप्तहेर संस्थांची मदत घेण्याकडे कल वाढला असल्याचे त्यांनी नमुद केले.
विवाहबाह्य संबंधांविषयीच्या विविध बाबींवर काकडे यांनी यावेळी लक्ष वेधले. गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांच्या प्रमाणात कमाली वाढ झाली आहे. त्यात विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोटापर्यंत पोहचणाऱ्यांचे प्रमाण साधारणत: ५० टक्के आहे. लग्न झाल्यावर अवघ्या काही महिन्यांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी गुप्तहेर संस्थांची मदत घेतली जाते. काही प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर, कार्यालयामध्ये वाढत्या कामाच्या व्यापामुळे पती-पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. तसेच भावनिक गोष्टींसाठी भागीदार शोधला जातो आणि पुढे हे संबंध वाढतात, असा दावा त्यांनी केला.
जोडीदाराशी बांधिलकी असलीच पाहिजे हा विचार तरुणांमध्ये दिसत नाही. त्याच्यात किंवा तिच्यात आता तितकासा रस नाही. समाधान, आनंद देणारा अन्य पर्याय उपलब्ध आहे. हा तरुणांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असला तरीही समाजमाध्यमांचा अतिवापर आणि इतर ठिकाणी सुरू असलेली भावनिक गुंतवणूक यामुळे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. अशावेळी जोडीदार एकमेकांवर आरोप करतात. मात्र, घटस्फोट घेण्यासाठी संशयाऐवजी पुरावे गोळा करण्यावरही भर दिला जातो. त्यासाठी अनेक जण खासगी गुप्तहेर संस्थांची मदत घेतात, असे त्यांनी सांगितले.
एका डॉक्टर दाम्पत्याचा घटस्फोटाचा अनुभव कथन करताना प्रिया काकडे म्हणाल्या की, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून पत्नी – पतीकडे दुर्लक्ष करीत होती. त्यानंतर मुलाचा जन्म झाला. त्याचे संगोपन करण्यास ती टाळाटाळ करू लागली. पत्नी रात्री उशिरापर्यंत समाज माध्यमाचा वापर करायची. रुग्णांवरील तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात जाण्याच्या बहाण्याने ती घराबाहेर पडायची. या प्रकारामुळे पती हैराण झाला होता. तिला जाब विचारताच मानसिक, शारीरिक छळ, हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमक्या महिलेने दिली. अखेर तिचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागताच पतीने खासगी गुप्तहेर संस्थेची मदत घेऊन पुरावे गोळा केले. त्यानंतर न्यायालयात पुरावे सादर करून घटस्फोट घेतला. तिला पोटगी आणि मुलाचा ताबा मिळाला नाही, असे काकडे म्हणाल्या.
