प्रवेश घेतेवेळी गोडगोड बोलणार.. दरवर्षी दहा टक्क्य़ांपेक्षा अधिक शुल्कवाढ होणार नाही, असे ठासून सांगणार.. परंतु एकदा का विद्यार्थी शाळेत आला की मग अव्वाच्या सव्वा शुल्क आकारायचे.. पालक माना खाली घालून ऐकून घेतील असा समज करून मनमानी करायची असा तोरा दाखवणाऱ्या शाळेला पालकांनी इंगा दाखवला तर पुन्हा पालकांवरच छडी उगारायची, मुलांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी द्यायची, असा प्रकार बोरिवलीतील जेबीसीएन या शाळेत उघडकीस आला आहे.
शाळेने केलेल्या भरमसाठ शुल्कवाढीला विरोध दर्शवणाऱ्या पालकांना या शाळेने धमकावले आहे. अवास्तव शुल्कवाढीविरोधात आवाज उठविणाऱ्या पालकांच्या मुलांना पुढील शैक्षणिक वर्षांपासून काढून टाकण्याची धमकी या शाळेने दिल्याने खासगी शाळांचा मनमानीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. या पालकांनी प्रवेश घेते वेळेस भरलेली अनामत रक्कमही थकीत म्हणून शाळेच्या तिजोरीत जमा केली जाईल, असे या शाळेने कळविल्याने पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
जेबीसीएन शाळेने पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क तब्बल ४९ हजारांनी वाढविले. या शुल्कवाढीला विरोध करीत काही पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. प्रवेश घेते वेळेस दरवर्षी शुल्कवाढ १० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल, असे आश्वासन आपल्याला देण्यात आले होते, असे पालकांचे म्हणणे आहे. ही शुल्कवाढही सर्व पालकांना सारखी नाही. शाळेने पायोनिअर आणि नॉन-पायोनिअर असा फरक करून नॉन-पायोनिअर पालकांकडूनच जास्तीचे शुल्क वसूल केले आहे. त्यालाही पालकांचा विरोध आहे. गेले सहा महिने पालक ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या मनमानी शुल्कवाढीविरोधात लढत आहेत. संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे शिक्षण हक्क कायदा, शुल्क नियंत्रण कायदा लागू नसल्याचे शाळेचे म्हणणे आहे; परंतु असे सांगून शाळेचे व्यवस्थापन पालकांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप फोरमचे जयंत जैन यांनी केला. फोरमने पालकांच्या मदतीने याविरोधात शिक्षण सचिव, बाल हक्क आयोग आदींकडे तक्रार दाखल केली आहे.
शाळेविषयी इतर तक्रारी
प्रत्येक पालकाकडून प्रवेश घेते वेळेस ९५ हजार रुपये जबरदस्तीने वसूल केले जातात.
नॅशनल जिओग्राफीतर्फे १६०० रुपये भरणेही बंधनकारक.
एक दिवस उशीर झाल्यास १०० रुपये दंड. पुस्तकांकरिता ५००० रुपये.
गणवेशासाठी ८००० रुपये
पालकांकडून बळजबरीने वसुली