मुंबई- खासगी शिकवणी शिक्षकाने ७ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मालाड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
आरोपी शिक्षक ४४ वर्षांचा असून गोरेगाव येथे राहतो. तो घरात लहान मुलींची खासगी शिकवणी घेतो. पीडित मुलगी ७ वर्षांची आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच इमारतीत राहतात. पीडित मुलगी आरोपीच्या घरी ऑगस्ट २०२४ पासून शिकवणीसाठी जात होती. त्यावेळी आरोपी शिक्षक तिला मोबाईल मध्ये गेम दाखविण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये न्यायचा आणि तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. काही दिवसांपासून मुलीच्या वागण्यात तिच्या पालकांना बदल जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी या भयानक प्रकाराची माहिती मुलीने दिली. ऑगस्ट २०२४ ते ९ जुले २०२५ या वर्षभराच्या कालावधीत तो मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता.
पीडित मुलीची कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. दिंडोशी पोलिसांनी आरोपी शिक्षकावर कलम ६४ (२), ६५(२), ७४ तसेच पोक्सोच्या कलम ४, ६, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू असून आणखी मुलींशी त्याने असे कृत्य केले आहे का त्याचा पोलीस तपास करत आहेत.
शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांवर होणार्या लैंगिक अत्याचाराच्या काही घटना
३ जुलै २०२५ – दादर येथील एका प्रतिष्ठित शाळेतील ४० वर्षीय महिला शिक्षिकेला १६ वर्षांच्या विद्यार्थ्यावर अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मुलाला पंचतारांकित हॉटेल मध्ये नेऊन ती शरीरसंबंध प्रस्थापित करत होती.
९ जुलै २०२५- मुलांना कराटे शिकवणारा २२ वर्षांच्या कराटे प्रशिक्षक १२ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता.. शिवाजी पार्क पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
२५ जून २०२५ – भाईंदर मधील प्रसिद्ध शिकवणीच्या ५० वर्षीय शिक्षकाकडून १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. हा शिक्षक ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत सलग या मुलीवर अत्याचार करत होता. नोव्हेंबर २०२४- नालासोपारा येथे एका शाळेत शिक्षक म्हणून काम करणारा ५० वर्षीय अमित दुबे हा त्याच्या खासगी क्लास मध्ये शिकणार्या १४ वर्षीय मुलीवर ऑक्टोबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत बलात्कार करत होता.