scorecardresearch

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची महाविद्यालयांमध्ये चाकरी!

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना प्रति तास ८० रुपये वेतन आहे,

teachers
(प्रतिकात्मक छायाचित्र )

वेतन फक्त एका तासाचे, काम मात्र पाच तास; उच्चशिक्षितांची संस्थाचालकांकडून पिळवणूक

‘आमच्या महाविद्यालयामध्ये पूर्णवेळ नोकरी करा, तुम्हाला कायमस्वरूपी प्राध्यापक पदावर घेतो’, या संस्थाचालकांच्या गोड बोलण्याला भुलून अनेक नेट, सेट, पीएचडीधारक प्राध्यापक तब्बल २२ वर्षांपासून तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करीत आहेत. या प्राध्यापकांना आठवडय़ाला फक्त सात तासांचे वेतन मिळत असतानाही महाविद्यालये मात्र त्यांच्याकडून प्रतिदिन पाच तासांपेक्षा अधिक वेळ फुकटात काम करून घेतात. अनेक नामांकित संस्थांच्या महाविद्यालयांमध्ये या उच्चशिक्षित तरुणांना राबवून घेतले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना प्रति तास ८० रुपये वेतन आहे, तर वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये हेच वेतन प्रति तास २४० रुपये आहे. या प्राध्यापकांनी नियमांनुसार महिन्याला २८ तासिका घेणे आवश्यक आहे. मात्र असे असूनही अनेक महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नियमित बोलावण्यात येऊन एक तासाऐवजी पाच तासांपेक्षा अधिक वेळ काम करवून घेण्यात येते. हा अक्षरश: उच्चशिक्षितांची पिळवणूक करण्याचा प्रकार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात दबक्या आवाजात सुरू आहे.

महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी प्राध्यापक नियुक्तीची जाहिरात निघेल, त्या वेळी तासिका तत्त्वावरील कामाचा अनुभव लक्षात घेऊन आपल्याला अध्यापनाच्या मुख्य प्रवाहात संधी मिळेल या एकाच आशेने राज्यभरातील तासिका तत्त्वावरील अनेक प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये ‘पडेल ती कामे’ करीत आहेत. याच संधीचा फायदा घेऊन अनेक महाविद्यालये त्यांना कामाला जुंपत आहेत.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापक सद्य:स्थितीमध्ये महाविद्यालये चालवत असल्याचे कौतुक अनेक प्राचार्य खासगीत बोलताना करतात. कायमस्वरूपी प्राध्यापकांना महिन्याकाठी १ लाख ८५ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. ज्या वेळी हा प्राध्यापक निवृत्त होतो, तेव्हा त्यांच्या जागी तीन तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. जागा भरताना मात्र एकच जागा भरण्यात येते. त्यामुळे भरण्यात आलेले दोन प्राध्यापक अतिरिक्त ठरतात. ही पद्धत अनेक वर्षे चालू असून, यातून संस्थाचालक आणि सरकारचे हितसंबंध जोपासले जात असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे.

मी राज्यातील नामांकित संस्थेच्या एका महाविद्यालयामध्ये तासिका तत्त्वावर काम करीत होतो. वरिष्ठ प्राध्यापक निवृत्त झाल्यावर तुमची या पदावर निवड करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात आले. या आशेवर राज्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणवून घेणाऱ्या एका संस्थेच्या महाविद्यालयामध्ये तब्बल १४ वर्षे काढली. नियमित ५ तासांपेक्षा अधिक काम केले. मात्र ज्या वेळी जागा भरण्यात आली त्या वेळी संस्थाचालकाच्या जवळील एका नातेवाईकाची संबंधित पदावर नियुक्ती करण्यात आली. आता दुसऱ्या एका महाविद्यालयामध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून काम करीत आहे.

– तासिका तत्त्वावरील एक प्राध्यापक

विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ८० टक्के शिक्षकांच्या जागा या कायमस्वरूपी असणे आवश्यक आहे. तसेच इतर २० टक्के शिक्षक हेही कंत्राटी स्वरूपात असावेत. त्यांचे वेतन पूर्णवेळ असणाऱ्या प्राध्यापकाएवढे असावे असा नियम आहे. मात्र सध्या तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना अतिशय तुटपुंज्या वेतनावर राबवून घेतले जात आहे. शैक्षणिकदृष्टय़ा प्रगत म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राची वाताहत झाली आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेवर असहकार पुकारल्याशिवाय या प्राध्यापकांची किंमत कळणार नाही.

– कुशल मुडे, सहसचिव, नॅशनल फोरम फॉर क्वॉलिटी एज्युकेशन

उच्चशिक्षित असलेल्या तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना आवश्यक तेवढे वेतन देणे आवश्यक आहे. हा संस्थाचालकांचा धंदा झाला आहे. राज्यातील विद्यापीठांनीही याबाबत आवश्यक ती खबरदारी घेतलेली नसून शिक्षणाचा दर्जा किती प्रमाणात खालावला आहे, याची एकदा तपासणी करणे आवश्यक आहे.

– टी. ए. शिवारे, अध्यक्ष, बिगरशासकीय महाविद्यालयांच्या प्राचार्याची संघटना

* ते’ करतात ही अतिरिक्त कामे

* पेपर तपासणे, परीक्षेसंबंधित इतर कामे करणे

* ‘नॅक’ची कामे करणे

* फायलिंग करणे

* शाळेतील सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात मदत करणे

* प्राचार्यानी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-02-2018 at 04:57 IST
ताज्या बातम्या