मुलांच्या प्रगतीबाबत पालक अंधारात; छपाईला विलंब झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

मुंबईमधील पालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रगतीपुस्तकच देण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांला नापास करायचे नाही असा नियम असल्यामुळे आपल्या मुलाची अभ्यासात झालेली प्रगती प्रगतीपुस्तकातील शेऱ्यांवरून स्पष्ट होते. परंतु प्रगतीपुस्तकच देण्यात न आल्याने मुलाच्या प्रगतीबाबत पालक चिंतीत झाले आहेत. तर प्रगतीपुस्तकाबाबत निरनिराळी उत्तरे देत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संभ्रम अधिकच वाढवला आहे. वार्षिक परीक्षेनंतर तरी प्रगतीपुस्तक मिळणार की नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील असुविधांमुळे विद्यार्थ्यांची गळती सुरूच आहे. गळती रोखण्यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तू आणि माध्यान्ह भोजन, सुगंधी दूध देण्यास सुरुवात केली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून २७ शालोपयोगी वस्तू वेळेवर मिळत नाहीत. तर काही वेळा काही वस्तू दिल्याच जात नाहीत. विद्यार्थ्यांना दुधाची बाधा झाल्यामुळे ते बंद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना शेंगदाण्याची चिक्की देण्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून पालिका दरबारी अद्याप केवळ खलच सुरू आहे. आता गेल्या वर्षभरात पालिका शाळांमध्ये झालेली चाचणी व सहामाही परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रगतीपुस्तकच दिलेले नाही, अशी तक्रार काही पालकांकडून करण्यात आली आहे.

नव्या शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकात गुण दिले जात नाहीत. प्रत्येक विषयातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबतचे शेरे प्रगतीपुस्तकात नोंदविले जातात. त्याचबरोबर प्रगतीपुस्तकामध्ये दर महिन्यातील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती, तसेच सहामाही परीक्षा व वार्षिक परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची याची माहिती प्रगतीपुस्तकात दिली जाते. मात्र चालू शैक्षणिक वर्षांमध्ये चाचणी परीक्षा अथवा सहामाही परीक्षा झाल्यानंतर पालिकेच्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रगतीपुस्तकच देण्यात आले नाही. त्यामुळे मुलाची अभ्यासात किती प्रगती झाली, तो शाळेत जातो की नाही हे पालकांना समजू शकलेले नाही. काही पालकांनी प्रगतीपुस्तकाबाबत शिक्षकांकडे विचारणा केल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. प्रगतीपुस्तकाच्या छपाईस विलंब झाल्याने ते शाळांना उशीरा उपलब्ध झाल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांची सारवासारव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रगतीपुस्तकाबाबत शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि काही शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्यात आला. मात्र मुख्याध्यापकांनी कानावरच हात ठेवले. तर अधिकाऱ्यांनी वेगवेगळी मते व्यक्त करीत सारवासारव केली. नव्या शिक्षण पद्धतीमुळे वर्षभर परीक्षा झाल्यावर प्रगतीपुस्त दिले जात नाही, वार्षिक परीक्षेनंतरच ते दिले जाते, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन वरच्या वर्गात पाठवायचे असल्याने प्रगतीपुस्तकाची गरज नाही, शिक्षकांकडे वर्षभराचा आढावा असून वार्षिक परीक्षेनंतर प्रगतीपुस्तक दिले जाईल अशी निरनिराळी उत्तरे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या सावळ्या गोंधळात पालक मात्र अंधारातच आहेत.