मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचा डेपो उभारण्यासाठी आरे कॉलनी येथील तब्बल २०४४ झाडे हलवण्याचा तसेच २५४ झाडे तोडण्याचा प्रस्ताव सोमवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागे ठेवण्यात आला.
मात्र पुढील महिन्यातील बैठकीत या झाडांच्या पुनरेपणाच्या माहितीचे सादरीकरण करण्यात येणार असून त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान या झाडांची तोडणी आधीच सुरू झाल्याचा आरोपही प्राधिकरणाच्या बैठकीत करण्यात आला.
 ‘एमएमआरडीए’चा प्रकल्प असलेल्या मेट्रोसाठी आरे कॉलनीतील २५०० झाडांना त्यांच्या जागेवरून हलवण्याची गरज आहे. त्यातील २५४ झाडे तोडण्याचा तर २,०४४ झाडे मरोळ-मरोशी येथील जागेत पुनरेपित करण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. महानगरपालिकेने आतापर्यंत पुनरेपणासाठी मंजूर केलेल्या झाडांचे नेमके काय झाले, असा प्रश्न सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी उपस्थित केला. प्राधिकरणाच्या सर्वच सदस्यांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल करण्यास विरोध केला. पुनरेपित झाडे जगण्याची शक्यता कमी असल्याने या झाडांच्या भवितव्याचा आणि शहरातील ढासळत्या पर्यावरणाचा विचार करून हा प्रस्ताव अमान्य करण्याची मागणी करण्यात आली. हा प्रस्ताव राज्य सरकारचा असून समाजोपयोगी आहे. शहरातील इतर ठिकाणी खासगी बिल्डरकडून होत असलेले पुनरेपण व या प्रकल्पातील पुनरेपण यात फरक असेल, या पुनरेपणासंबंधी पुढील बैठकीत विस्तृत माहितीचे सादरीकरण केले जाईल, त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जावा, अशी भूमिका प्राधिकरणाचे अध्यक्ष व पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी मांडली. प्राधिकरणाची पुढील बैठक मार्चमध्ये होणार असून सादरीकरणानंतर प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे, असे एका सदस्याने सांगितले.

खारफुटीच्या संवर्धनासाठी पाच कोटी रुपये
वृक्ष प्राधिकरणाकडे निधी पडून असताना मुंबई किनाऱ्यालगतच्या खारफुटीविषयी पालिकेकडून फार काही केले जात नाही. खारफुटीवर टाकले जाणारे डेब्रिज व बांधल्या जाणाऱ्या झोपडय़ा हटवण्याचे प्रयत्न पालिकेने केले पाहिजेत, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली. त्यानंतर खारफुटीच्या संवर्धनासाठी पाच कोटी रुपयांच्या उपसूचनेसह अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.  

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी अंधेरी-वर्सोवा येथील २०० झाडांचे पुनरेपण केले जाणार होते. मात्र आज ती झाडे कुठे आहेत, ते कोणालाही माहिती नाही. आताही वेगळे काही होण्याची शक्यता नाही.
-देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.