मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर ‘पु. ल. कट्टा’ उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. बहुआयामी पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवार, १२ जूनपासून ‘पु. ल. कट्टा’ या उपक्रमाला पुन्हा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संकुलात सुरूवात करण्यात आली. आता दर शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नूतनीकृत खुल्या रंगमंचावर नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच पु. ल. कट्ट्यावर सादर होणारे उपक्रम प्रेक्षकांना निःशुल्क पाहता येणार आहेत.
पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘पु. ल. कट्टा’ उपक्रमाअंतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून पु. ल. देशपांडे यांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमात गायक शार्दुल कवठेकर, अदिती पवार, पेटीवादक प्रणव हरिदास, तबलावादक सौरभ शिर्के, अभिवाचक अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी डॉ. कविता सोनावणे, नृत्यांगना राधिका जैतपाळ, ज्येष्ठ कलाकार डॉ. शिरीष ठाकूर सहभागी झाले होते. तर जान्हवी दरेकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.
‘नवोदित कलाकारांमधील कलागुणांना चालना देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी ‘पु. ल. कट्टा’ हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. हा खुला रंगमंच वैयक्तिक कला व समूह कला, दोन्ही प्रकारासाठी उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी कला सादर करण्यासाठी कलाकारांना अर्ज करून जागा आरक्षित करावी लागेल. सध्या हा उपक्रम दर आठवड्याच्या शुक्रवारी राबविण्यात येणार आहे. मात्र कलाकार व प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून इतर दिवशीही उपक्रम राबविण्याचा विचार केला जाईल’, असे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
‘पु. ल. कट्टा’ उपक्रमात कसे सहभागी व्हाल ?
‘पु. ल. कट्टा’ उपक्रमाअंतर्गत नूतनीकृत खुल्या रंगमंचावर नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी pldeshpande111@gmail.com या ई – मेल आयडीवर अर्ज करून संबंधित दिवसाचे आरक्षण करावे लागेल. सध्या हा उपक्रम दर शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत राबविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी कला सादर करण्यासाठी माफक शुल्क आकारण्यात येणार आहे.