एलईडी दिव्यांना आमचा विरोध नाही आणि त्याचे महत्त्व आम्हाला माहीत आहे; परंतु मरिन ड्राइव्हवरचा राणीचा रत्नहार हा मुंबईचे वैभव आहे आणि सोडियम दिवे बसवून ते परत मिळावे एवढीच आमची इच्छा आहे. त्यामुळे सरकारने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करू नये, असे सुनावत पांढऱ्याऐवजी पिवळ्या रंगाच्या एलईडी दिव्यांचा पर्याय उपलब्ध असेल आणि ते लावून रत्नहाराची गेलेली रया परत मिळणार असेल तर पिवळे एलईडी दिवे लावण्यात यावे, असे आदेश अखेर उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
हा मुद्दा सरकारने प्रतिष्ठेचा बनवू नये, असे न्यायालयाने फटकारल्यानंतर तसेच पिवळ्या रंगाच्या एलईडी दिव्यांच्या पर्यायाचा आपण विचार करू शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यावर सरकारने न्यायालयाने निर्णय दिल्यास पांढऱ्याऐवजी पिवळे एलईडी दिवे लावण्याची तयारी दाखवली. त्याची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठाने पांढऱ्याऐवजी पिवळ्या एलईडी दिव्यांनी राणीचा रत्नहार उजळविण्याचे आदेश दिले.
मरिन ड्राइव्हवर लावलेले एलईडी दिवे काढून पुन्हा तेथे सोडियम दिवे का लावले जात नाही, असा सवाल न्यायालयाने केला होता.  एनर्जी एफिशिएन्सी सव्‍‌र्हिसेस लिमिटेड या कंपनीने याबाबतच्या आदेशाचा फेरविचारासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यातच बुधवारी  सुनावणीच्या वेळी १५ ऑगस्टपूर्वी पांढरे एलईडी दिवे काढून सोडियम दिवे लावले जाऊ शकतील का, अशी विचारणा केली होती.शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता अनिल सिंह यांनी पांढरे एलईडी दिवे लावण्यामागील कारणे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. एलईडी दिव्यामुळे विजेची आणि पैशांची बचत होते. शिवाय या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे पांढऱ्या एलईडी दिव्यांच्या प्रकाशात सर्व काही स्पष्ट  दिसते. प्रामुख्याने सुरक्षेच्या दृष्टीने हे दिवे आवश्यक असल्याचा सल्ला तंत्रज्ञांकडून मिळाल्यावर ते बसविण्यात आल्याचे सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर हा परिसर मुंबईची शान असून ती बिघडवू नये असे न्यायालयाने म्हटले.