राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना गृह खात्यातील काही कळत नाही. फक्त महाराष्ट्रातील माहिती शरद पवार यांना पोहोचवण्यासाठी त्यांना गृहमंत्रीपदावर बसवण्यात आले आहे. ते तर कुरिअर सर्व्हिस आहेत, अशी घणाघाती टीका करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 
मुंबईत गुरुवारी संध्याकाळी एका छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी कृष्णकुंज निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना लक्ष्य केले.

राज्यातील सर्व महिलांनी पाटील यांच्या मुंबई आणि सांगलीतील निवासस्थानी काचेच्या बांगड्यांचे बॉक्स त्यांना भेट म्हणून पाठवावेत, असेही आवाहन राज ठाकरे यांनी केले. जेवढे जास्त बॉक्स जातील, तेवढे ते लवकर राजीनामा देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, याआधी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा २००९ मध्ये निवडणुकीनंतर त्यांना गृह खाते देण्यात आले. मुळात पाटील हे गृह खाते सांभाळण्यासाठी सक्षम नाहीत. मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक घटना घडल्या. पोलिसांवर हल्ले झाले. पत्रकारांवर हल्ले झाले. पत्रकारांच्या गाड्या फोडण्यात आल्या. मात्र, दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पाटील यांनी राज्यातील पोलिसांच्या बदल्या अडवून ठेवल्या आहेत, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.