मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनीच्या विकासासाठी र्सवकष आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी ‘आरे’च्या पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांचे डांबरीकरण न करता काँक्रीटीकरण करण्यात येईल. ‘आरे’ येथील तलावांमधील गाळ महापालिकेकडून काढण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल.
आरे वसाहत ही केंद्र शासनाने पर्यावरणदृष्टय़ा संवेदनक्षम क्षेत्र म्हणून घोषित केल्याने आरे वसाहतीतील पर्यटनस्थळांचे सुशोभीकरण करण्यासाठी मर्यादा आहेत. त्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून र्सवकष विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. –राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री