छळवणुकीचा नवा अद्ययावत ‘मार्ग’ रोखण्याचे महाविद्यालयांसमोर आव्हान

देशभरातील महाविद्यालयांत गेली दोन वर्षे आटोक्यात आलेले रॅगिंगचे प्रकार यंदा वाढले असून त्यात नव्या अद्ययावत संपर्कमाध्यमाचीही भर पडल्याचे वास्तव समोर येत आहे. विद्यार्थ्यांमधील भांडणे, मारामाऱ्या, चिडवाचिडवी याबरोबरच आता व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरील टोकाला जात असलेले मतभेद, त्यातून होणारी भांडणे, धमकावणी आणि समाजमाध्यमांवरील शेरेबाजी यांच्यामाध्यमातून रॅगिंग होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेत गैरप्रकारांना आळा घालताना या नव्या आव्हानांना कसे तोंड द्यायचे, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर उभा राहिला आहे.

रॅगिंगचे प्रकार कमी झाल्याचा दावा होत असला तरी २०१७ मध्ये देशातील महाविद्यालयांमध्ये रँगिंगच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. वर्गात शेरेबाजी झाली, मोठय़ा वर्गातील मुलांकडून अपमान झाला, कधीतरी धमकावले गेले किंवा मारामारी केली गेली; अशा स्वरूपाच्या घटनांची नोंद शिक्षण संस्थांमधून होत होती. मात्र आता या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून, समाजमाध्यमांवरून चालणाऱ्या हीन पातळीवरच्या शेरेबाजीची भर पडली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सुरू केलेल्या मदतवाहिनीवरही अशा प्रकारच्या काही तक्रारींची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर दमदाटी केल्याच्या, चिडवाचिडवी केल्याच्या तक्रारी कधी तरी येत असल्याचे पुण्यातील एका महाविद्यालयाच्या विद्यार्थी मदत केंद्रांतील शिक्षक समुपदेशकांकडून सांगण्यात आले.

नवे आव्हान

प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थाचे व्हॉट्स अ‍ॅपवर गट असतात. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संवाद वाढत असतो. वर्गातील शिक्षकांनी तयार केलेल्या गटांव्यतिरिक्त विद्यार्थीही आपापले अनौपचारिक गट तयार करतात. महत्त्वाच्या सूचना, वर्गात शिकवलेल्या घटकांची टिपणे अशा गोष्टींची देवाणघेवाण या गटावर चालते. त्यामुळे वर्गाइतकेच महत्त्व या गटांनाही आले आहे. मात्र एखाद्या विद्यार्थ्यांलाच सर्व वर्गाने सतत चिडवणे, त्याच्यावर शेरेबाजी करणे असे प्रकारही या गटांवर घडत असल्याचे दिसून येत आहे. या ‘रॅगिंग’ला कंटाळून गटातून बाहेर पडूनही मानसिक तणाव कायमच असतो. कारण त्याच विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालयांत वावरताना असुरक्षित वाटत असते, असे काही रॅगिंगग्रस्त विद्यार्थी सांगतात. याबाबत एका प्राचार्यानी सांगितले, ‘‘आम्ही विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या कायद्याची ओळख करून देतो. सायबर गुन्हेगारीबाबतही ओळख करून देतो. मात्र विद्यार्थ्यांमधील भांडणांची सायबर गुन्हा म्हणून प्रत्येक वेळी नोंद होऊ शकत नाही आणि व्यावहारिकदृष्टय़ा विद्यार्थ्यांना तशी तक्रार करून तिचा पाठपुरावा करीत राहाणे शक्यही नसते. मात्र त्याच वेळी महाविद्यालयेही व्हॉट्स अ‍ॅप गटांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तक्रारी आल्यास त्याची दखल घेतली जाते. मात्र रॅगिंग म्हणून त्याची नोंद केली जात नाही.’

रॅगिंगच्या व्याख्येनुसार  वर्गातील, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये कुठेही, कोणत्याही स्वरूपात भांडण झाले किंवा विद्यार्थ्यांना असुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण झाले तर त्याची रँगिंग म्हणून नोंद होऊ शकते.  विद्यार्थी अशा प्रकारच्या तक्रारी करू शकतात. येणाऱ्या तक्रारींमध्ये समाजमाध्यमांवरील शेरेबाजी असल्याचे उल्लेख असतात. यंदा एकूणच रँगिंगच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्यातील समाजमाध्यमांवरून शेरेबाजी झाल्याच्या तक्रारी किती याची स्वतंत्र नोंद अद्याप करण्यात येत नाही.    – डॉ. राजेंद्र कचरू, अध्यक्ष, अमन मूव्हमेंट (रॅगिंगग्रस्तांचे मदत केंद्र)