सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रवादीचा नेहमीच सन्मान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीची जादा जागांची मागणी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्य केली होती. या महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीतही काँग्रेसने मदत करावी ही राष्ट्रवादीची आपेक्षा होती, पण राज्यातील नेत्यांच्या ठाम विरोधानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीला झुकते माप देण्यास नकार दिला. परिणामी या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही.

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील सहा जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. राष्ट्रवादीने तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा करून, आघाडीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टोलविला. काँग्रेसच्या वतीने तीन मतदारसंघांत आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सहापैकी चार मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर नांदेडची जागा काँग्रेसकडे आहे. आघाडीत राष्ट्रवादीने चार विद्यमान जागांसह जळगाव अशा एकूण पाच तर काँग्रेसने एक जागा लढवावी, असा राष्ट्रवादीचा मुळ प्रस्ताव होता. काँग्रेसने मात्र निम्म्या म्हणजे प्रत्येकी तीन जागा मिळाव्यात, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादीहा प्रस्ताव मान्य नव्हता. यातून आघाडीचे घोडे आडले.  उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत म्हणजे ५ तारखेपर्यंत तोडगा काढता येऊ शकतो, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

विधान परिषद निवडणुकीत पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हे ठरविण्याकरिता गेल्याच आठवडय़ात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे बैठक झाली होती. तेव्हा आघाडीत निम्मा वाटा मिळाला पहिजे, ही पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. पतंगराव कदम आदी नेत्यांची भूमिका राहुल गांधी यांनी मान्य केली. राष्ट्रवादीला एवढय़ा जागा सोडण्याऐवजी काँग्रेसनेच सर्व जागा लढवाव्यात, अशी सूचना राहुल यांनी केली होती. राहुल गांधी यांच्या मनात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल कायम अढी राहिली आहे. पवारही राहुल गांधी यांना टोले लगाविण्याची संधी सोडत नाहीत.

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेहमीच शरद पवार यांचा मानसन्मान राखला. पवारांनी विदेशीची मुद्दा उपस्थित करूनही २००४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सोनिया आघाडीसाठी पवारांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात जेव्हा केव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संबंधात विघ्ने आली तेव्हा सोनियांनी पवार नाराज होणार नाहीत याची खबरदारी घेतली. २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या घटली होती, तरीही राष्ट्रवादीकडील सारी खाती कायम ठेवली. २००९च्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे २० आमदार जास्त निवडून आल्यावर खात्यांमध्ये बदल करण्याची मागणी राज्यातील नेत्यांनी केली होती. पण सोनियांनी राष्ट्रवादीचे महत्त्व कायम राखले. गेल्या जून महिन्यात विधान परिषदेच्या तीन जागांपैकी दोन जागा राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेस नेत्यांचा विरोध होता. प्रफुल्ल पटेल यांच्या मध्यस्थीनंतर १०, जनपथने राष्ट्रवादीच्या कलाने घेतले होते. हा सारा इतिसाह असला तरी राहुल गांधी मात्र पवारांना फार काही महत्त्व देण्यास तयार नाहीत. राहुल यांच्या विरोधानेच आघाडीचे सूत जुळले नाही.

काँग्रेसचे उमेदवार

  • सातारा-सांगली – मोहनराव कदम
  • गोंदिया-भंडारा – प्रफुल्ल अगरवाल
  • नांदेड – अमर राजुरकर

राष्ट्रवादीचे उमेदवार

  • सातारा-सांगरी – शेखर गोरे
  • पुणे – अनिल भोसले
  • भंडारा-गोंदिया – रमेश जैन.
  • राष्ट्रवादीने सातारा-सांगलीचे विद्यमान आमदार प्रभाकर घार्गे यांच्याऐवजी गेल्याच आठवडय़ात राष्ट्रवादीत दाखल झालेल्या गोरे यांना उमेदवारी दिली आहे.

सहापैकी चार जागा आमच्याकडे असताना काँग्रेसच्या तीन जागांची मागणी अव्यहार्य होती. भाजप-शिवसेनेचा फायदा होऊ नये म्हणून आम्ही आघाडीसाठी आग्रही होतो. पण काँग्रेसच्या राज्यातील काही नेत्यांना राष्ट्रवादीची संगत नकोशी वाटते. तसेच दिल्लीतील नव्या नेतृत्वाची तशीच भूमिका दिसते. आघाडीचे निर्णय शेवटी काँग्रेसने घ्यायचा आहे.  प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे

सरचिटणीस सहापैकी पाच जागांवर राष्ट्रवादीला पाठिंबा देणे शक्यच नाही. प्रत्येकी तीन जागांवर तोडगा काढण्याची भूमिका राष्ट्रवादीला बहुधा मान्य झालेली दिसत नाही. शेवटी निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहेअशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi and sonia gandhi over ncp congress alliance
First published on: 02-11-2016 at 01:28 IST