इंटरनेटवरील विशिष्ट संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि परदेशी मुलींच्या साह्याने वेश्याव्यवसाय चालवण्याचा त्यांचा उद्योग होता. उच्चभ्रू समाजातील व्यक्तींना पंचतारांकित हॉटेलमध्ये या परदेशी मुली लाखो रुपयांच्या मोबदल्यात उपलब्ध करून दिल्या जात होत्या.  दिल्ली, पुणे, बंगळूरु, हैदरबाद, मुंबई यांसारख्या महानगरांसह अलिबाग परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरू होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि या परदेशी मुलींच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा उलगडा झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबागसह रायगड जिल्ह्यातील विविध भागात संकेतस्थळाच्या माध्यमातून परदेशी मुली वेश्या व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती प्रसिद्ध व्हायच्या. रायगड पोलिसांना याचा सुगावा लागला होता. मात्र कारवाई कशी करायची हा मोठा प्रश्न होता. पोलीस अधीक्षक अनिल परस्कर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागावर सोपवली.

गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान होते. कारण संकेतस्थळावर एक मोबाइल क्रमांक सोडला तर कुठलीच माहिती उपलब्ध नव्हती. पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांनी तपासाची रणनीती तयार केली. सुरुवातीला संकेतस्थळावर फोन करून बनावट ग्राहक म्हणून संपर्क साधण्यात आला. अलिबाग परिसरात परदेशी मुली हव्या असल्याची मागणी नोंदवण्यात आली. सुरुवातीला समोरच्या फोनवरून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. नंतर मात्र पोलिसांना दुसरा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला.

पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पुन्हा एकदा संपर्क साधला. यावेळी मात्र एका दिवसासाठी एका परदेशी मुलीसाठी १ लाख रुपयांची मागणी समोरून करण्यात आली. सुरुवातीला काही टक्के अगाऊ  रक्कम बँकेत भरावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. यानंतर परदेशी मुलींची छायाचित्रे उपलब्ध करून दिली जातील, असेही सांगण्यात आले. मुंबईतील एका प्रतिष्ठित बँकेतील एक खाते क्रमांक देण्यात आला.

एवढी मोठी रक्कम बँकेत भरून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता होती. मात्र समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी ही रक्कम भरणे गरजेचे होते. त्यामुळे पोलिसांसमोर हा धोका पत्कारायचा का हा प्रश्न होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागणी केलेली ठरावीक रक्कम दिलेल्या खात्यावर भरण्यात आली. यामुळे परदेशी मुलींची मागणी करणारे, खरोखरच ग्राहक असल्याची खात्री पटली. यानंतर एका महिलेचा क्रमांक पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आला. महिलेशी संपर्क साधल्यानंतर तिने दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाचे नागरिक असलेल्या पाच मुलींची छायाचित्रे पोलिसांना उपलब्ध करून दिली आणि यातून हव्या असलेल्या मुली निवडण्याची सूचना केली. बनावट ग्राहकांनी तीन मुली निवडल्या आणि अलिबागमध्ये पाठवण्याची सूचना केली.

अलिबागमधील पंचतारांकित हॉटेलमधील तीन खोल्या आरक्षित करण्यात आल्या. ठरल्याप्रमाणे एका गाडीतून तीन परदेशी मुली या हॉटेलमध्ये दाखल झाल्या. यानंतर पोलिसांना या वेश्या व्यवसायाची खात्री पटली. पंचांना घेऊन पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला. मुलींना ताब्यात घेण्यात आले. तपासाचे एक चक्र पूर्ण झाले. आता हे रॅकेट चालवणाऱ्यांपर्यंत त्यांना पोहोचायचे होते.

मुलींना गाडीतून आणणाऱ्या चालकाला पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतले. नंतर पोलिसांनी ज्याच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला होता, त्या व्यक्तीला विरारमध्ये ताब्यात घेण्यात आले. सेक्स रॅकेटची मूळ सूत्रधार असणाऱ्या महिलेकडे पोलिसांनी आपला मोर्चा वळवला. रातोरात ही कारवाई करायची होती. कारण थोडाही सुगावा लागला असता तरी ही महिला फरार होण्याची भीती होती. वांद्रे येथील एका उच्चभ्रू वसाहतीत ही महिला राहत असल्याचे पोलिसांना समजले. पहाटे सहाच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. महिलेसह आणखी दोन परदेशी मुली आढळून आल्या. याच मुलींचे छायाचित्र पोलिसांना पाठवण्यात आले होते.

याप्रकरणी चार जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९५६ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर पाचही परदेशी मुलींना सुधारगृहात ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. लवकरच सर्व मुलींना त्यांच्या देशात परत पाठवले जाणार आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. यासाठी लाखो रुपयांच्या रकमा ग्राहकांकडून उकाळल्या जात होत्या. यातील ५० टक्के रक्कम दलालांना तर ५० टक्के रक्कम परदेशी मुलींना दिली जात होती. याच पद्धतीने या मुलींनी अलिबागसह बंगळुरू, चंडीगढ, बंगळूरु, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली येथेही वेश्याव्यवसाय केल्याची कबुली दिली आहे. सर्व मुली कोलंबिया देशाच्या नागरिक असल्याचे समोर आले आहे. प्रवासी व्हिसावर त्या भारतात आल्या असून त्यांच्या पासपोर्ट आणि व्हिसाची तपासणी सध्या सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad police busted high profile online sex racket
First published on: 01-08-2018 at 01:36 IST