अंबरनाथमधील कारखान्यात उत्पादन; फेब्रुवारीपासून विक्रीस सुरुवात
शुद्ध आणि सुरक्षित पाण्याच्या प्रवाशांच्या ‘मूलभूत हक्का’ची पूर्तता करण्यासाठी आयआरसीटीसीने सुरू केलेल्या ‘रेल नीर’ला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. मात्र सध्या एक लिटरच्या मापात उपलब्ध असलेल्या या बाटल्या उपनगरीय प्रवासात प्रचंड गैरसोयीच्या असल्याने आता खास मुंबईकरांसाठी ५०० मिलीच्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. त्यासाठी दिल्लीहून ५०० मिलीच्या दोन लाख बाटल्या मागवून प्रायोगिक तत्त्वावर त्यांची विक्री करण्यात आली होती. या प्रयोगाला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘रेल नीर’च्या अंबरनाथ येथील कारखान्यातच या बाटल्यांच्या उत्पादनासाठीची प्रक्रिया आयआरसीटीसीने सुरू केली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपासून या ५०० मिलीच्या आणि दहा रुपये किमतीच्या छोटय़ा बाटल्या प्रवाशांच्या हाती दिसणार आहेत.
प्रवाशांना रास्त दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘रेल नीर’ हा प्रकल्प आयआरसीटीसीच्या माध्यमातून सुरू केला. त्यातील मुंबई येथील ‘रेल नीर’चा कारखाना अंबरनाथ येथे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. या कारखान्यात सध्या दर दिवशी एक लिटरच्या दोन लाख बाटल्या तयार होतात. या बाटल्या प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या प्रवासासाठी तयार करण्यात येत आहेत.
उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी मात्र या एक लिटरच्या बाटल्या प्रवासादरम्यान हाताळण्यासाठी गैरसोयीच्या ठरत होत्या. रेल्वेने एक लिटरबरोबरच अर्धा लिटर मापाच्या बाटल्याही उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती. आयआरसीटीसीने या मागणीची दखल घेत दोन महिन्यांपूर्वी दिल्लीतील ‘रेल नीर’च्या कारखान्यात तयार होणाऱ्या ५०० मिलिच्या तब्बल दोन लाख बाटल्या प्रायोगिक तत्त्वावर मुंबई उपनगरीय स्थानकांवर विकण्यासाठी आणल्या होत्या. या बाटल्या आठवडाभरात संपल्यानंतर आता आयआरसीटीसीने मुंबईतच या अर्धा लिटर बाटल्यांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीही आयआरसीटीसीने मागवली आहे. आता जलशुद्धीकरण आणि अर्धा लिटर मापाच्या बाटल्या तयार करण्यासाठीच्या निविदा आयआरसीटीसीने काढल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण होईल. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार असून फेब्रुवारीमध्ये या बाटल्या हाती पडतील, असे आयआरसीटीसीतील सूत्रांनी स्पष्ट केले.