मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – सिकंदराबाद दूरंतो एक्स्प्रेसला कायमस्वरूपी दोन शयनयान डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे या एक्स्प्रेसची प्रवासी क्षमता वाढेल.
गाडी क्रमांक १२२१९ / १२२२० लोकमान्य टिळक टर्मिनस – सिकंदराबाद दूरंतो एक्स्प्रेसला एक प्रथम वातानुकूलित श्रेणीचा डबा, चार द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे डबे, १० तृतीय वातानुकूलित श्रेणीचे डबे, एक द्वितीय आसन व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, एक जनरेटर कार आणि एक पँट्री कार असे एकूण १८ डबे होते. तर, आता नवीन संरचनेनुसार, या रेल्वेगाडीला एक प्रथम वातानुकूलित श्रेणीचा डबा, ४ द्वितीय वातानुकूलित श्रेणीचा डबा, १० तृतीय वातानुकूलित श्रेणीचा डबा, २ शयनयान, एक द्वितीय आसन व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार असे एकूण २० डबे जोडले जातील.
गाडी क्रमांक १२२१९ लोकमान्य टिळक टर्मिनस – सिकंदराबाद दूरंतो एक्स्प्रेस सुधारित संरचनेसह १७ सप्टेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून चालविण्यात येईल. तर, गाडी क्रमांक १२२२० सिकंदराबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस दूरंतो एक्स्प्रेस सुधारित संरचनेसह १६ सप्टेंबर पासून चालवण्यात येईल. या जादा दोन जोडलेल्या शयनयान डब्यांचे आरक्षण १० सप्टेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर खुले होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.