मुंबईः वादळी वारे, पाऊस व ठिकठिकाणी झालेल्या अपघातांमुळे मुंबईतील वाहतुकीवर सोमवारी सायंकाळी परिणाम झाला. पूर्व उपनगर, दादर, भायखळा, ट्रॉम्बे, वडाळा, जोगेश्वरी परिसरात वाहतूक कोंडी झाली.

मुंबईत अचानक जोरदार वारा, धूळ व पावसामुळे अनेक ठिकाणी अपघात झाले. वडाळा पूर्व येथील बरकत अली नाका परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरील लोखंडी भाग कोसळल्यामुळे ८ ते १० गाड्यांचे नुकसान झाले. या परिसरातली वाहतूक पूर्णपण ठप्प झाली होती. बरकत अली जंक्शन, पूजा जंक्शन येथील वडाळ्यावरून उत्तरेकडे जाणारी वाहतुकीसंथ गतीने सुरू होती. पूर्व उपनगरातून घाटकोपर व ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना एक ते दीड तास अधिक कालावधी लागत होता. वडाळा पुलावरील वाहतूकही दुसऱ्या मार्गिकेवर वळवण्यात आली.

हेही वाचा – मुंबई : वादळी वाऱ्यामुळे सागरी किनारा मार्गाचा दुसरा गर्डर बसवण्याचे काम लांबणीवर

घाटकोपर छेडा नगर येथे १२० बाय १२० फुटांचा जाहिरात फलक सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जवळील पेट्रोल पंपावर कोसळला. पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती. याशिवाय दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर टेम्पोमध्ये बिघाड झाल्यामुळे दादर ते भायखळा येथील उत्तर वाहिनीवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. तसेच ट्रॉम्बे येथील फ्रीवे टनल येथे अपघात झाला. त्यामुळे ट्रॉम्बे येथून दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक प्रभावीत झाली होती. वाहनांंच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा – मुंबईत १७ हजार आरोपींची तपासणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विशेष मोहिम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय पश्चिम उपनगरात काही ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. शिवाजी पार्क परिसरातही धुळीमुळे दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली होती. वाहतूक पोलिसांकडे वाहतूक कोंडीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या असून त्या तत्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.