कुलदीप घायवट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईसह राज्यभरात बहुतांशी भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमान वाढले असून संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात ऊन – पावसाचा लपंडाव चालणार आहे. राज्यातील काही भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडेल. मात्र, पावसाचे प्रमाण जुलैपेक्षा कमी असेल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

जून महिना कोरडा गेल्याने राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. परिणामी, पाण्याची टंचाई भासू लागली होती. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढला. परंतु, सध्या वाऱ्यांच्या दिशेत बदल झाला आहे आणि जमिनीवर हवेचा दाब वाढल्याने समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, ऑगस्ट महिन्यात काही भागात किरकोळ पाऊस पडेल, पण त्यानंतर तेथे उघडीप होईल, असे ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा एक ते दोन टक्केच अधिक पाऊस

राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत पावसाची तूट भरून निघाली. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक जिल्ह्यात पावसाची तूट नोंदवली आहे. तर, ऑगस्ट महिन्यात पाऊस पडण्यास अनुकूल हवामान नसल्याने पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा एक ते दोन टक्केच अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागात पाऊस ?

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वाऱ्यांची दिशा बदलून वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतील. त्यामुळे राज्यातील कोरड्या भागात पाऊस पडेल.  धुळे, लातूर, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद या पाच जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस पडेल. या भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, घाट भागात पावसाचे प्रमाण कमी

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात आणि घाट भागात पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain atmosphere heat august rain relaxation mumbai print news ysh
First published on: 01-08-2022 at 15:10 IST