गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांत शुक्रवार सकाळपासून पावसाने हजेरी लावली. पुढील चार दिवस अनेक भागात पुन्हा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या अनेक दिवस वाढलेले ऊन आणि आर्द्रता यामुळे मुंबई आणि उपनगरातील उकाडा वाढला होता. तुरळक ठिकाणी पावसाची एखाद दुसरी हलकी सर हजेरी लावत होती. मोठ्या विश्रांतीनंतर शुक्रवारी अनेक भागात पाऊस पडला. बोरिवली, कांदिवली, मालाड येथे या भागात दुपारी एक वाजण्याचा सुमारास रिमझिम पाऊस झाला. पवई तलाव परिसरात ऊन आणि पावसाचा खेळ सुरू होता.

सध्या दक्षिण कोकण, घाट भागात, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या किनार्‍यावरील दाट ढग दाटून आले आहेत. गुजरात, मुंबई ठाण्यासह राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. पुढील चार दिवस पाऊस सक्रिय राहणार आहे.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्राने २५.४ मिमी आणि तर कुलाबा केंद्राने १३.८ मिमी पावसाची नोंद केली.