महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. मात्र यंदा राज ठाकरे वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना भेटणार नाहीत. राज यांनी १२ जून रोजीच यासंदर्भातील माहिती आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून दिली होती. राज ठाकरे यांनी प्रकृतीसंदर्भातील कारण देत काही दिवसांमध्ये माझी शस्त्रक्रीया असून आपल्याला कोणताही धोका पत्करण्याची इच्छा नसल्याचं सांगत राज यांनी यंदा कोणालाही वाढदिवसाच्या दिवशी भेटायला जमणार नाही असं सांगितलं. या निर्णयामुळे राज समर्थकांचा हिरमोड झाला असला तरी रात्री १२ नंतर राज यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या नवीन घराच्या गॅलरीमधून खाली रस्त्यावर जमलेल्या त्यांच्या समर्थकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्याचं पहायला मिळालं.

नक्की पाहा >> Photos: अभ्यंगस्थान करणारे फडणवीस, पतंग उडवणारे मोदी अन् आकडे फेकणारे गडकरी… राज ठाकरेंची गाजलेली ४५ व्यंगचित्रे

वाढदिवसानिमित्त आपण कोणाला भेटणार नसल्याचं राज ठाकरेंनी १२ जून रोजीच जाहीर केलं होतं. तरीही त्यांच्या अनेक समर्थकांनी मुंबईतील दादरमधील शिवाजीपार्कजवळ असणाऱ्या राज यांच्या ‘शीवतीर्थ’ या निवासस्थानकाखाली मोठी गर्दी केली होती. रात्री १२ नंतर राज ठाकरे हे घराच्या गॅलरीत आले आणि त्यांनी हात उंचावून घरासमोर जमलेल्या मनसैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. फार कमी वेळासाठी राज गॅलरीमध्ये होते. मात्र राज यांनी शुभेच्छा स्वीकारल्याने समर्थक आनंदाने घरी परतले.

भेटून बरं वाटतं पण…
माझ्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्यानं घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचं राज यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं. “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचं सांगितलं. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदिवस आला आहे. दरवर्षी तुम्ही सर्वजण प्रेमाने उत्साहाने मला भेटायला येतात. मी देखील आपली सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यावर बरं वाटतं. असं असलं तरी यावर्षी १४ जूनला मला कोणालाच भेटता येणार नाही. कारण या गाठीभेटींमध्ये पुन्हा संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर शेवटी मी शस्त्रक्रिया किती पुढे ढकलायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे,” असं राज यांनी ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझी शस्त्रक्रिया पूर्ण होईल आणि बरं वाटायला लागेल तेव्हा मी आपणा सर्वांना निश्चित भेटेन. त्यामुळे १४ जूनला आपण कोणीही घरी येऊ नये ही विनंती,” असं आवाहनही राज ठाकरेंनी समर्थकांना केलंय.