शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथे स्मारक उभारण्यात शिवसेनेला अजूनही यश आलेले नसतानाच शिवडी विधानसभा मतदारसंघात नरे पार्क येथे मीनाताई व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे मनसेचे गटनेते व आमदार बाळा नांदगावकर यांच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांना शिवसेनेने विरोध केला आहे. या योजनांचे भूमिपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज दसऱ्याला होणार असून, या वेळी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांची तोफ धडाडणार असल्याचे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव मार्गदर्शन करणार आहेत. त्याच वेळी राज ठाकरे परळच्या नरे पार्क येथे नांदगावकर यांच्या मतदारसंघातील १४ विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत. यातील नरे पार्कमधील कामांना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. ‘मैदान बचाव’ आंदोलन हाती घेऊन मीनाताई व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे होणाऱ्या विकासकामांना सेनेने विरोध केला आहे. रेसकोर्स आणि शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांच्या नावे स्मारक करताना राजकारण करू नका, अशी विनंती करणारे शिवसेना नेते नरे पार्कवर दुटप्पी भूमिका घेतात. स्वत: बाळासाहेबांच्या नावे एकही धड गोष्ट उभी करू शकले नाहीत आणि मनसेने तेच काम भव्य स्वरूपात हाती घेतले तर यांच्या पोटात कसे दुखते, यावरून राज ठाकरे शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविणार असल्यामुळे रविवारी दसऱ्याला शिवसेना-मनसेत जोरदार कलगी-तुरा रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज ठाकरे हे सकाळी उद्घाटन करणार असून त्यांनी तेथे टीका केली तर सायंकाळी शिवाजी पार्कवरील सभेत त्याचे उत्तर देण्यास उद्धव ठाकरे समर्थ असल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Oct 2013 रोजी प्रकाशित
‘नरे पार्क’वर राज बरसणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथे स्मारक उभारण्यात शिवसेनेला अजूनही यश आलेले नसतानाच शिवडी विधानसभा

First published on: 13-10-2013 at 01:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray set to address at nare park on occasion of dussehra