आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X (ट्विटर) पोस्ट करत लता मंगेशकर यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लता मंगेशकर यांचा जादुई स्वर हा आजही आपल्या मनावर अधिराज्य करतो आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसंच राज ठाकरेंनीही आपल्या पोस्टमधून लता मंगेशकर यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

माझ्या आयुष्यातील निरवतेत, कोलाहलात, सुखात, दुःखात, उद्वेगात, पराकोटीच्या आनंदात, ज्या आवाजाने पाठ सोडली नाही, साथ दिली, त्या आवाजाचा, म्हणजेच लता दीदींचा जन्मदिवस. माझ्यासारख्या लाखो लोकांच्या आयुष्याला पुरून उरेल अशा ह्या दैवी स्वराला अभिवादन. #LataMangeshkar असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

लतादीदींनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांनी गायलेल्या हजारो गाण्यांमधून त्या सदैव आपल्या बरोबर राहतील यात काही शंकाच नाही. राज ठाकरेंचे शब्दही याचीच प्रचिती देत आहेत.

लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार

लता मंगेशकर यांनी देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न (२००१) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याशिवाय पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण (१९६९), ‘साधी माणसं’ या चित्रपटासाठी १९६५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (१९९७), तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, मध्य प्रदेश सन्मान (१९८४) या पुरस्कारांचाही समावेश आहे.

९२ वर्षी घेतला अखेरचा श्वास

लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली होती. नंतर त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच ५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण ६ २०२२ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

Story img Loader