Raj Thackeray : मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाज कंटकांनी रंग फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पुतळ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात लाल रंग पडलेला आढळून आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली.
राज ठाकरे यांच्याकडून पुतळ्याची पाहणी
राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंचा पुतळा असलेल्या परिसरात जी घटना घडली आहे, त्याची संपूर्ण माहिती घेतली आहे. या परिसरात नेमके काय काय घडले आणि आतापर्यंत पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आलीय, याची संपूर्ण माहिती राज ठाकरेंनी घेतली. राज ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मनसे सचिव सचिन मोर यांनी घटनास्थळी येऊन आढावा घेतला. त्यानंतर सर्व घटनाक्रम राज ठाकरे यांना सांगण्यात आला. यानंतर राज ठाकरे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शाखाप्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आधीच आपल्या नेत्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची माहिती घेतली आहे.
आज नेमकी घटना काय घडली?
कोणीतरी सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या जवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला आहे घटनास्थळी शिवसैनिक जमले. काही शिवसैनिक पुतळ्याच्या आजूबाजूची साफसफाई करताना दिसून येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणच्या स्थानिक आमदार, खासदार, काही शिवसैनिक परिसरात दाखल झाले. जमलेल्या शिवसैनिकांनी साफसफाई सुरू केले. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. सकाळी त्या आधी असं काहीच नव्हतं. आजूबाजूचा लाल रंग शिवसैनिकांनी पुसून काढला आहे. शिवसैनिकाने आजूबाजूचा लाल रंग पुसत साफसफाई केली.
अनिल देसाई काय म्हणाले?
“कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजकंटक किंवा भेकडांच्या औलादीला कोणती संस्कृती, कोणते संस्कार झालेले नसतील. यांचा पोलिसांतर्फे शोध घेतला जात आहे. जे व्हायचं ते होईल, अशा प्रवृत्तींना पोलीस किंवा सरकारी यंत्रणा काय, आज तुमचे जे काही कर्तव्य आहे, ते नेमकं त्यावर काय चाललंय का, याचा निषेध करण्यापलीकडील या गोष्टी आहेत आणि त्यामुळे सरकार अपयशी ठरलं हे आपल्या प्रत्येक वेळी जाणवत आहे, असे अनिल देसाई म्हणाले.
खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?
घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा सगळा प्रकार चिड आणणारा आणि संताप आणणारा प्रकार आहे. माझ्या डोळ्यांत आंसू आणि अंगार आहे. अशा प्रकारचा अपमान करण्याची हिंमत कुणी केली हे शोधलं पाहिजे. सतत मेरी माँ का अपमान झाला म्हणणाऱ्यांनी आता उत्तर दिलं पाहिजे. मीनाताई ठाकरेंना आम्ही माँ म्हणतो. माँसाहेबांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली त्यांचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. मंगळवारपर्यंत या ठिकाणी सतत पोलिसांचा पहारा होता. हा पहारा कुणी काढला? याचीही चौकशी झाली पाहिजे. पोलीस बाजूला बसायचे ते गेले कुठे? ज्या कुणी हे कृत्य केलंय त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे याचं हे उदाहरण आहे.