मुंबई: मराठी विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नखशिल्पकार (नेल आर्टिस्ट) राजश्री मोरेने पुन्हा एकदा मनसेला डिवचले आहे. मराठी बोलून प्रगती होत नाही आम्हाला चांगल्या रस्त्यांची गरज आहे, असे तिने एका चित्रफितीत म्हटले आहे. राज ठाकरे यांनी खासदार दुबे यांना दिलेल्या धमकीचीही तिने हसून खिल्ली उडवली आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

राजश्री मोरे (३९) ही नखशिल्पकार (नेल आर्टिस्ट) असून समाज माध्यम प्रभावक (सोशल मिडिया इन्फ्लुएनसर) आहे. काही दिवसांपूर्वी तिने मराठीविरोधात वक्तव्य केल्याने मनसेने तिच्या घरी जाऊन जाब विचारला होता आणि तिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. काही दिवसांनी तिला मनसे नेत्याच्या मुलाच्या वाहनाने धडक दिली होती. राजश्री मोरेने त्याची खरडपट्टी काढून चित्रफित तयार केली होती. त्यामुळे राजश्री मोरे चर्चेत आली होती. आता रविवारी राजश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर नवी चित्रफित पोस्ट केली आहे. या चित्रफितीत तिने पुन्हा मराठी भाषेचा अवमान केला असून मनसेला डिवचले आहे.

चित्रफितीत काय म्हटले आहे?

आपल्याला भाषेची गरज नसून चांगल्या रस्त्यांची गरज आहे, असे राजश्रीने या चित्रफितीत म्हटले आहे. घरातून बाहेर पडताच रस्त्याची अवस्था बिकट आहे. परंतु भाषेवरून वाद घातला जात आहे. मी मराठी आहे. परंतु मराठी बोलून प्रगती होत नाही, असे ती म्हणाली. खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला मारण्याची भाषा केली होती. त्यांचा समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा रोडच्या सभेत घेतला होता. दुबे यांना समुद्रात डुबे डुबे के मारेंगे असे राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याची तिने हसून खिल्ली उडवली आहे. मी शाळेत नाही. मोठे झाले आहोत असा टोलाही लगावला आहे. या चित्रफितीमुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

मनसे नेत्याचा मुलाला अद्दल घडवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवार ७ जुलैच्या मध्यरात्री राजश्री मोरे अंधेरी येथील आपल्या निवासस्थानी वाहनाने जात होती. त्यावेळी विरा देसाई रस्त्याजवळ एका पांढऱ्या रंगाच्या गाडीने तिच्या वाहनाला धडक दिली. राजश्रीने पाठलाग करून ती गाडी थांबवली. त्यावेळी गाडीत राहिल शेख नावाचा तरूण अर्धनग्न अवस्थेत होता. त्याने शर्ट घातलेले नव्हते. त्याने माझे वडील मनसेचे नेते असल्याचे सांगून राजश्री मोरेला शिविगाळ आणि दमदाटी केली. राजश्री मोरेने नेमकी ही संधी साधली. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण प्रकरणाची चित्रफितही तिने तयार केली होती. अंबोली पोलिसांनी राहील शेख विरोधात अश्लील शिविगाळ करून विनयभंग करणे (कलम ७९), भरधाव वेगाने वाहन चालवून जिवितास धोका निर्माण करणे (कलम २८१, १२५) तसेच मद्यापान करून वाहन चालविल्याप्रकरणी मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.