मुस्लीम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळेच या भागांमध्ये लस घेण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. म्हणूनच आता राज्य सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे. सलमानच्या मदतीने या मुस्लीम बहुल परिसरांमध्ये जनजागृती करुन येथील लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा सरकारचा विचार आहे. करोना लसीकरण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे. मात्र काही भागांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहे, असं टोपे यांनी सांगितलं होतं. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावरून भाजपा नेते राम कदम यांनी निशाणा साधला आहे.

“सलमान खानला महाराष्ट्र सरकार लसीकरणला गती यावी म्हणून घेणार आहे? की कोणत्या विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी? आम्हाला सलमान खान संदर्भात कोणताही प्रश्न नाही. मात्र भूतकाळ आठवता महाराष्ट्र सरकार आणी काँग्रेसच्या हेतुबाबत शंका जरूर आहे.” असं राम कदम यांनी ट्विट करून म्हटलंय.

जालन्यामध्ये सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, “मुस्लीम बहुल परिसरामध्ये अजूनही लसीबद्दल शंका आहे. आम्ही यासाठी आता सलमान खान आणि धर्मगुरुंची मदत घेणार असून मुस्लीम समाजातील सदस्यांनी लसीकरण करुन घेण्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत.” धर्मगुरु आणि कलाकार यांचा सर्वसामान्यांवर फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच त्याचं म्हणणं लोक ऐकतील असा विश्वास टोपेंनी व्यक्त केलाय. सलमान खानचा मोठा चाहता वर्ग असून महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे.

आता ठाकरे सरकार घेणार सलमान खानची मदत