मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे पार पडलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती कायम ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर भाजपने रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात शिर्डीसह लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या दहा जागा सोडाव्यात, अशी मागणीही या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शिर्डी येथे शनिवारी पार पडलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपशी युती करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. रामदास आठवले सध्या केंद्रात मंत्री असून, त्यांची राज्यसभेची मुदत २०२६ पर्यंत आहे; परंतु लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी असून त्यासाठी त्यांना शिर्डी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ हवा आहे. मित्रपक्ष म्हणून भाजपने आठवले यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला तर, त्याचे स्वागत करू, असे पक्षाच्या ठरावात म्हटले आहे. त्याशिवाय लोकसभेची आणखी एक जागा तसेच विधानसभेच्या दहा जागा पक्षाला सोडाव्यात, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. बैठकीला रिपाइंचे नागालँडचे नवनिर्वाचित आमदार इम्ति चोबा, लिमा चँग, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे उपस्थित होते.