रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या भारत यात्रेत भाजप सरकारलाच टीकेचे लक्ष्य केले आहे. दलितांवरील अत्याचार रोखण्यास भाजप सरकार अपयशी ठरत असेल, तसेच संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास, भाजपबरोबरची युती तोडण्याचा इशारा ते अनेक सभांमधून देत आहेत. रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी त्यांनी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आठवले यांनी २६ जानेवारीपासून कन्याकुमारी येथून जाती तोडो, समाज जोडो अशी घोषणा देत भारत यात्रा सुरू केली आहे. गेल्या चार दिवसांत कन्याकुमारी, पडुचरी, मदुराई येथे त्यांच्या जाहीर सभा झाल्या. भारत यात्रेच्या निमित्ताने पाच-सहा हजार लोकांच्या सभा घेऊन दक्षिण भारतात त्यांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. त्यानिमित्ताने आपण राष्ट्रीय नेते आहोत हे दाखविण्याचा व त्या आधारावर केंद्रात मंत्रिपद मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.
आठवले यांच्या भारत यात्रेच्या आधीच हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येवरून देशभर सामाजिक व राजकीय वातावरण तापले आहे. आठवले यांच्या भारत यात्रेतही त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या सभांमधून दलित अत्याचाराच्या प्रश्नावर भाजप सरकारला टीकेचे लक्ष्य केले.
भाजपबरोबर रिपाइंची राजकीय युती आहे, वैचारिक नाही. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला तर, भाजपबरोबरची युती तोडली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.