“उद्धव ठाकरे या महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे, कारण आता आमच्याबरोबर आहेत राज ठाकरे”, असं म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या कवितेतून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली.

हेही वाचा – राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसमोरच केला पंडित नेहरूंचा उल्लेख; नेमकं काय घडलं?…

काय म्हणाले रामदास आठवले?

“महाराष्ट्रात आणि देशात लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतो आहे. या देशात बाबासाहेबांचे संविधान मजबूत आहे. या देशाचे पंतप्रधान मजबूत आहेत. या राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार, राज ठाकरे आणि मी मजबूत आहे. त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं असेल, ते बोला चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला”, अशी खोचक टीका रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर केली.

“या ठिकाणी आम्ही सर्व इथे आलो आहोत. मोदींचे नेतृत्व विकासाच्या दिशेने जात आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत. अजूनही पैसे मिळणार आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणाचाही डाव नाही. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याला झोडल्याशिवाय राहणार नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – महायुतीच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या; म्हणाले “सर्…

“निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे, असा आरोप केला जातो. मात्र, बाबासाहेबांचे संविधान धोक्यात नाही. याउलट महाविकास आघाडी धोक्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, अशी अफवा पसरवून दलित समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळी त्यांनी कवितेतून उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. “उद्धवजी या महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे, कारण आता आमच्याबरोबर आहेत राज ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का गेला उद्धव ठाकरे”, असे ते म्हणाले.