शिवसेना-भाजपशी युती करून फारसे काही हातात पडेल का, याबद्दल साशंक असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आता बहुजन समाज पक्षाबरोबर(बसप) समझोता करण्याची तयारी दर्शविली आहे. या संदर्भात आपली बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, तर आठवले यांच्या प्रस्तावावर मायावतीच अंतिम निर्णय घेऊ शकतील, अशी प्रतिक्रिया बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना-भाजपबरोबर केलेल्या युतीच्या बदल्यात रामदास आठवले यांना लोकसभेच्या काही ठरावीक जागा हव्या आहेत, परंतु त्याहीपेक्षा त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे; परंतु त्याला महायुतीतील प्रमुख पक्षांकडून अनुकूल प्रतिसाद मिळत नसल्याने आठवले नाराज आहेत. त्यातूनच त्यांनी औरंगाबाद येथे ३ ऑक्टोबरला झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सभेत बसपशी समझोता करण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे आठवले आता काही वेगळ्या राजकीय पर्यायाचा विचार करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बसपकडे युती करण्याच्या विधानासंदर्भात आठवले यांना विचारले असता, दलित-बहुजनांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर बसप व आरपीआयने एकत्र यावे, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. बसप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांचे बऱ्याच राज्यांमधून खासदार-आमदार निवडून आलेले आहेत, तसेच आरपीआयचे अनेक राज्यांमध्ये संघटन आहे. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आले तर, त्याचा राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर वेगळा परिणाम होईल, असे आठवले यांचे मत आहे.   
यापूर्वी १९९६ मध्ये पुणे येथे झालेल्या एकिकृत रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय मंडळाच्या बैठकीत बसपशी युती करण्याचा आपण प्रस्ताव मांडला होता आणि त्याला त्या वेळच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता, याची आठवणही आठवले यांनी करून दिली; परंतु त्या वेळी प्रत्यक्ष काही युती झाली नाही. मात्र आता पुन्हा एकदा तसा प्रयत्न व्हावा, अशी आपली भूमिका आहे. या संदर्भात आपण बसपचे राज्याचे प्रभारी खासदार वीरसिंह यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून मायावती यांच्याशीही चर्चा करण्याची त्यांनी तयारी दर्शविली. त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहू, असे त्यांनी सांगितले. आठवले यांची बसपशी युती करायची तयारी असली तरी, त्याबाबतचा निर्णय फक्त पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती याच घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया विलास गरुड यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale set to collision with bsp
First published on: 07-10-2013 at 01:59 IST