रामदास कदम यांची ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर ग्वाही ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती’ आणि ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प’ स्पर्धेचा सत्कार सोहळा थाटात

हे सरकार टिकेल का, माहिती नाही.. टिकले तर पुढे मी मंत्री असेन का,  माहिती नाही.. पण मी सरकारमध्ये असेपर्यंत प्लास्टिक बंदी मात्र करणारच, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर दिली. ‘लोक सत्ता’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आयोजित ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती’ आणि ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प’ या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमात त्यांनी प्लास्टिकबंदीची निकड व्यक्त केली. या दोन्ही स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यासाठी बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे रामदास कदम यांनी आपल्या भाषणात चौफेर राजकीय फटकेबाजी करुन प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर असणाऱ्या अभ्युदय को.ऑप. बँक  लिमिटेडचे मधुसूदन राजपूरकर उपस्थित होते. या वेळी स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती’ आणि ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प’ या स्पर्धाना मुंबईसह राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही स्पर्धामधून निवडण्यात आलेल्या विजयी स्पर्धकांचा गौरव समारंभ बुधवारी थाटात पार पडला. याप्रसंगी विजयी असणाऱ्या स्पर्धकांना भरघोस बक्षिसे देऊन सन्मानित करणात आले. ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प’ स्पर्धेला नॉलेज पार्टनर म्हणून लाभलेल्या ‘ग्रीन सिटी’चे ए. के. मिश्रा या वेळी उपस्थित होते. तसेच पुण्याच्या ‘स्वच्छ’ या कंपनीच्या सूची स्मिता पै यांचे या स्पर्धेला सहकार्य लाभले. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे संजय भुस्कुटे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरण रक्षणाच्या संदर्भात ‘लोकसत्ता’मधील लेख आणि बातम्या कायमच मार्गदर्शक ठरतात, असे कदम या वेळी म्हणाले.याशिवाय राज्यातील ९० टक्के नगर परिषदा आणि महानगरपालिका आपल्या अर्थसंकल्पातील २५ टक्के निधी हा घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याच्या प्रक्रियेवर खर्च करत असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. जाहिरातबाजी करून पर्यावरण संवर्धनाचे काम होणार नसून त्यासाठी आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी मांडले. तसेच राज्यातील एकूण घनकचरानिर्मितीचे प्रमाण वाढते असून यासाठी ठोस पावले उचलण्याचे काम पर्यावरण खाते आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असल्याची माहिती मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी दिली.

वृक्षतोड करणाऱ्या विकासकांवर कारवाई

विकासकांकडून करण्यात येणाऱ्या इमारत बांधकामावेळी वृक्षांची तोड केली जाते. असे करताना एक वृक्ष तोडल्यानंतर दोन वृक्षांचे रोपण करणार या शर्तीवर झाडांची कत्तल केली जाते. मात्र प्रत्यक्षात ही विकासक मंडळी झाडे लावतात का? किंवा लावल्यानंतरही त्यांच्याकडून झाडांची निगा राखली जाते का? हा संशोधनाचा विषय असल्याचे कदम म्हणाले. म्हणूनच गेल्या पाच वर्षांत विकासकांकडून तोडल्या गेलेल्या वृक्षानंतर त्या विभागाची काय अवस्था आहे; याचा सव्रेक्षण अहवाल तयार करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर कॅबिनेटच्या बैठकीत केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वेक्षण अहवालाच्या आधारावर दोषी विकासकांवर कारवाई करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असल्याची माहिती कदम यांनी दिली.