विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाल संपत असल्याने त्यांच्यासोबत विधान भवनाच्या परिसरात आज खास फोटोसेशन आयोजित करण्यात आलं होतं. या फोटोसेशनसाठी सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते, कामकाज मंत्री आणि विधान परिषदेचे सर्व सदस्यांच्या उपस्थितीत फोटो काढण्यात आले. मात्र कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या फोटोमधील सर्वात उजवीकडील खुर्ची रिकामी राहिल्याचं चित्र हा फोटो काढताना दिसून आलं. उपस्थित सदस्यांपेक्षा या ही रिकामी खुर्ची कोणाची? हीच चर्चा अधिक रंगल्याचं चित्र पहायला मिळालं. सामान्यपणे खुर्चीसाठी धावपळ करणारे नेते अशी सर्वसामान्य लोकांमध्ये प्रतिमा असणाऱ्या नेत्यांपैकी नक्की ही खुर्ची कोणी आणि कशासाठी सोडली याबद्दल चर्चा रंगू लागलीय. मात्र या रिकाम्या खुर्चीचा किस्सा फारच रंजक आहे.
नक्की वाचा >> “५० वर्ष मातृ संघामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो लावला नाही त्यांनी…”; ‘त्या’ आरोपामुळे वडेट्टीवार भाजपावर संतापले
झालं असं की विधान परिषदेमधील कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांसोबतचं फोटो सेशन करण्यात आलं. त्यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम अनुपस्थित होते. रामदास कदम यावे यासाठी सर्वच सदस्य त्यांची वाट पाहत होते परंतु कदम हे अगदी फोटो काढेपर्यंत अनुपस्थित राहिले. रामदास कदम निरोप समारंभाच्या फोटो सेशनला यावे यासाठी उपस्थित सदस्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचा फोन न लागल्याने उपस्थित सदस्यांनी फोटो काढून घेतले. शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी रामदास कदम यांना फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन लागला नाही. “भाईंचा फोन लागत नाहीय,” असंही गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं.
नक्की वाचा >> “नितेश राणेंना कायमचे निलंबित करा”; आदित्य ठाकरेंसंदर्भातील वक्तव्यानंतर भास्कर जाधव आक्रमक
रामदास कदम यांच्यासहीत सहा सदस्यांचा आज विधान परिषदेमधील शेवटचा दिवस होता. आज रामदास कदम यांच्यासहीत भाई जगताप, वरुण काका जगताप, गिरीष व्यास, सतेज पाटील, अमरिष पटेल, गोपिचंद बजोरीया, प्रशांत परिचारक या सहा सदस्यांचा कार्यकाळ संपला. या सदस्यांनी सभागृहामध्ये निरोपाचं भाषण केलं. यामध्ये रामदास कदम यांनाही भाषण केलं. त्यानंतर सर्व सदस्यांनी निरोप घेणाऱ्या सदस्यांसोबत फोटो सेशनला उपस्थित लावली.
नक्की वाचा >> ‘आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या’; २०० एसटी कर्मचाऱ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
मात्र रामदास कदम उपस्थित नव्हते. त्यांना फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. अखेर नंतर बराच वेळ पाहिल्यानंतरही ते फोटो सेशनसाठी आले नाही, त्यांचा फोनही लागत नसल्याने उपस्थित सदस्यांनी रामदास कदम यांच्यासाठी ठेवलेली खुर्ची रिकामी ठेवतच फोटो काढून घेतला. फोटो सेशन संपल्यानंतर रामदास कदम आले आणि थेट विधान भवनाच्या बाहेर चालत निघून गेले.

ठाकरे सरकारवर नाराजी…
रामदास कदम हे शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगलीय. त्यांनी शुक्रवारी खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि मनसे नेते वैभव खेडकर यांना अपात्र ठरवावं अशी मागणी केली होती. वैभव यांची अनेक भ्रष्टाचारी प्रकरण आपण समोर आणली असून सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाईंकडे केली होती. यावेळी प्रसारमाध्यमांनी कदम यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिल्याचं म्हटलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना राम कदम यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंना काही कल्पना नसून आपण सरकारकडे मागणी केलेली आणि आपण शिवसेनेविरोधात भूमिका घेतलेली नाही असं म्हटलं होतं. याच नाराजीमधून आज रामदास कदम यांनी फोटो सेशनला हजेरी लावणं टाळलं का, अशी चर्चा विधानसभेच्या दबक्या आवाजात सुरु असल्याचं पहायला मिळालं.