मुंबई : पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी सोलापूर येथील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (५२) यांना उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी देशमुख यांना १२ सप्टेंबपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. तक्रारदार आणि देशमुख दोघेही २००८ पासून एकमेकांना ओळखत होते. देशमुख विवाहित असल्याचे माहीत असूनही तक्रारदार महिलेने त्यांच्याशी प्रेमसंबंध ठेवले, असा युक्तिवाद देशमुख यांच्या वतीने वरिष्ठ वकील शिरीष गुप्ते आणि वकील आशिष गायकवाड यांनी केला.  पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, तिशीतील तक्रारदार महिलेची देशमुख यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर देशमुख यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून सोलापूर, पुणे, मुंबई आणि सांगली येथे अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. देशमुख यांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला याबाबत कुठेही वाच्यता केल्यास परिणाम भोगण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने तक्रारीत केला आहे.