मुंबई : करोनाकाळात गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्यांना पुन्हा प्रत्यक्ष लेखी परीक्षा देण्याची वेळ आल्यामुळे उच्च आणि तंत्रशिक्षण संस्थांचे निकाल घसरले. यंदा अनुत्तीर्ण झालेल्या अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळणार असून त्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयांसाठी सेतू अध्ययन उपक्रमही राबवण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत याबाबत माहिती दिली.
राज्यात राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण आदी शाखांच्या विविध ६४२ अभ्यासक्रमाच्या पदविका परीक्षा घेण्यात येतात. करोनाकाळात सन २०२०ची उन्हाळी परीक्षा तसेच त्यानंतरच्या हिवाळी, उन्हाळी अशा चार परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. करोनाची साथ ओसरल्यावर यंदा म्हणजे उन्हाळी २०२२ परीक्षा लेखी म्हणजेच ऑफलाइन घेण्यात आल्या. त्याचा निकाल जुलै अखेरीस जाहीर झाला. मात्र करोना काळात ऑनलाइन परीक्षेचा ९० टक्क्यांवर दिसणारा निकाल घसरून ३७ टक्के लागला. या पार्श्वभूमीवर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांची पुढील महिन्यात लगेच फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी या विद्यार्थ्यांसाठी संबंधित विषयांचे योग्य आकलन होण्यासाठी उपचारात्मक अध्यापन उपक्रम संस्थास्तरावर राबिण्याचे आदेश संस्थांना देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
नुकसान भरून काढण्यासाठी..
करोना काळात ऑनलाइन अध्यापनात विद्यार्थ्यांना अपेक्षित शिक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक वाढविण्यासाठी सेतू अध्ययन उपक्रम सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम चालू शैक्षणिक वर्षांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी प्रत्येक सत्राच्या सुरूवातीला सर्व विषयांसाठी राबविण्यात येईल. तसेच हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवणी दिली जाणार असून त्यानुसार परीक्षा घेतली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार असून विशेष म्हणजे हे दोन्ही उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मोफत असतील, असेही पाटील यांनी सांगितले.
काय झाले?
दोन वर्षे चढय़ा गुणतालिका पाहण्याची सवय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीसा अनपेक्षित असा लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. ऑनलाइन परीक्षेत ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षेत ३५ ते ४० टक्के गुण मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाबाबत तक्रारी केल्या.
काय होणार?
उन्हाळी २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्र किंवा अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळेल. विद्यार्थी ज्या विषयांत अनुत्तीर्ण झाले असतील त्याच विषयाची परीक्षा त्यांना देता येईल. या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग घेण्यात येईल. नियमित वर्ग झाल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी त्यांच्याच संस्थेत विद्यार्थी या वर्गाना हजेरी लावू शकतील.
‘कोविड बॅच’चा ठपका
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी पदविकाधारक विद्यार्थ्यांवर ‘कोविड बॅच’चा ठपका पडल्यामुळे या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे उन्हाळी २०२२च्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी सप्टेंबरमध्ये फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.