जनतेची कामे होत नाही, भ्रष्टाचार रोखला जात नाही, प्रशासनावर अंकुश नाही, सरकारच्या कार्यपद्धतीत दोष आहे, अशी कागदोपत्री आणि पक्षात आल्यावर दिलेली आश्वासने नऊ वर्षांनंतर पूर्ण झालेली नसल्यामुळे असलेली वैयक्तिक नाराजी यामुळे आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राजीनामा स्वीकारल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करू, असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणूक लढविणार की नाही, हे अजून ठरवले नसल्याचे स्पष्ट केले.
राणे यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही. राणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर जी पावले सरकारने उचलायला हवी होती. ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या. त्या अद्याप केलेल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीत पुरेसे यश मिळवण्याजोगे काम सरकारकडून होत नाही. अशावेळी मंत्रिमंडळातील सदस्य म्हणून आणखी पराभवाच्या पापात मला सहभागी व्हायचे नाही. सरकारकडून जनतेची कामे त्वरित होत नाहीयेत. प्रशासनावर सरकारचा अंकुश नाही. भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. अनेक निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही. अधिकारी कामे टाळताहेत, ही सर्व कारणे आपण राजीनामापत्रात लिहिली असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसमध्ये आलो त्यावेळी सहा महिन्यांत मुख्यमंत्रीपद देऊ, असे सांगण्यात आले होते. पण नऊ वर्षे झाली तरी मुख्यमंत्रिपद दिले नाही. माझ्यासोबत आलेल्या आमदारांना कोणतेही मंत्रिपद देण्यात आले नाही. माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनाही आपण न्याय देऊ शकलो नाही, ही देखील वैयक्तिक कारणे राजीनाम्यामागे असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.