कमाल तापमानात मोठी घट; राज्यही गारठले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई / पुणे : सकाळच्या गुलाबी थंडीचा कडाका वाढत असून मुंबईकरांवर पुन्हा स्वेटर किंवा ब्लँकेट वापरण्याची वेळ आली आहे. या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद गुरुवारी शहरात झाली. दहा वर्षांत प्रथमच कमाल तापमान २५ अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याचे हवामान खात्याने सांगितले.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पारा घसरत असून गुरुवारी कमाल तापमानही सरासरी एक ते दोन अंशांनी खाली उतरले. त्यामुळे सकाळपासूनच हवेत असलेला गारवा दुपारीही जाणवत होता. काही ठिकाणी दिवसभर वातावरणात धुकेही होते. सांताक्रूझ येथे गुरुवारी २५.३ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथील तापमान २६ अंश होते. गेल्या दहा वर्षांत २०१४ आणि २०१२ या दोन वर्षांत कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद आहे; परंतु या हंगामात कमाल तापमान २५ अंशांपर्यंत खाली आल्याची विक्रमी नोंद झाली.

राज्यस्थिती..

कोकण विभागातील दिवस आणि रात्रीचे तापमान यंदाच्या हंगामात प्रथमच सरासरीच्या खाली आले आहे. गुरुवारी रत्नागिरी येथे १८.५ अंश किमान तापमान नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्रात नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरचे तापमान १०.८ अंशांवर आहे. त्याचप्रमाणे पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी भागांतही किमान तापमान सरासरीखाली आल्याने या भागात गारवा वाढला आहे. मराठवाडय़ातील उस्मानाबाद, नांदेड येथील किमान तापमान सरासरीखाली गेल्याने येथे गारठा वाढला आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास असल्याने या भागात थंडी कायम आहे.

थंडीभान

शहरातील बऱ्याच ठिकाणचे तापमान गुरुवारी १५ अंश से.पर्यंत खाली आले होते. बोरिवलीत १३ अंश से., तर पनवेलमध्ये १२ अंश से. किमान तापमान नोंदले गेले. सांताक्रूझ आणि कुलाबा येथे अनुक्रमे १५.४ अंश से. आणि १७.६ अंश से. किमान तापमान नोंदले गेले.

कारण काय?

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी आणि राज्यातील कोरडय़ा हवामानामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ झाली आहे. कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरीसह सर्वच ठिकाणी किमान आणि कमाल तापमान हंगामात प्रथमच सरासरीखाली गेले असल्याने या भागात बोचरी थंडी अवतरली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील तापमानातही घट झाली आहे. विदर्भातील थंडीच्या लाटेची स्थिती निवळली असली, तरी या भागात अद्यापही गारठा कायम आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record of ten years of cold in mumbai akp
First published on: 17-01-2020 at 02:06 IST