मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे.  पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या  अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

पदसंख्या अशी..

आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे, औषध निर्मात्याची ३२४ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६, आरोग्य सेवकाची तीन हजार १८४ पदे आणि आरोग्य सेविकांची सहा हजार ४७६ पदे अशी एकूण १० हजार १२७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment health department health servant health supervisor empty posts recruitment process ysh
First published on: 13-05-2022 at 00:02 IST