आरोग्य खात्यातील सर्व प्रवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.  पालिका रुग्णालयांमध्ये अनेक पदे रिक्त असल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत यासाठी आरोग्य समितीच्या अध्यक्ष गीता गवळी यांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालक डॉ. नागदा, प्रमुख वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सीमा मलिक, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. कुबल यावेळी उपस्थित होते.
कांदिवली शताब्दी रुग्णालयात केमोथेरपी विभाग, तसेच सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदन केंद्र सुरू करावे, कंत्राटी पद्धतीवर डॉक्टरांची सेवा पुन्हा सुरू करावी, उपनगरातील रुग्णालयात रक्त तपासणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करणे, शिवडी रुग्णालयातील क्षयरोगग्रस्त कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्यावी, सर्व प्रसुतीगृहांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी आदी सूचना गीता गवळी यांनी या बैठकीत केल्या. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन म्हैसकर यांनी यावेळी दिले.