मुंबई : विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला या परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’ वासीयांना चार ते नऊ इतके अतिरिक्त चटईक्षेत्रफळ देण्याच्या मुंबई महापालिकेने नगरविकास विभागाला पाठविलेल्या प्रस्तावावर आता दोन वर्षे होत आली तरी निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे एअरपोर्ट फनेलवासीयांच्या सुमारे साडेचारशे इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.
पालिका आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावानुसार विलेपार्ले आणि सांताक्रूझ परिसरासाठी अनुक्रमे ४.४८ व ४.९७, तर कुर्ला परिसरासाठी ९.२२ इतके चटईक्षेत्रफळ प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र इमारतीच्या उंचीवर बंदी असल्यामुळे हे चटईक्षेत्रफळ वापरता येणार नसल्याने यानिमित्ताने निर्माण होणारा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) इतरत्र वापरण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यासाठी विकास आराखडय़ात सुधारणा करावी लागणार आहे. चटई क्षेत्रफळ वापरावरील निर्बंधामुळे या इमारतींचा पुनर्विकास ठप्प झाला होता. या इमारतींसाठी फक्त एक इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध होते. त्यामुळे कुणीही विकासक पुढे येत नव्हते. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्रफळ मिळावे आणि इमारतींच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्रफळ वजा जाता उर्वरित चटई क्षेत्रफळ टीडीआर स्वरूपात विकण्याची परवानगी देऊन बांधकामाचा खर्च निघावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती.
नव्या विकास आराखडयमत त्याबद्दल उल्लेख केला जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. विमानतळ फनेल रहिवाशांसाठी नव्या विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद आणण्यास नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. नव्या विकास आराखडयमत त्याबाबत धावता उल्लेखही होता. परंतु विकास नियमावलीत मात्र या विषयाला स्पर्शही करण्यात आलेला नाही. या इमारतींचा आहे त्याच ठिकाणी पुनर्विकास आणि त्यातून निर्माण होणारा विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) खुल्या बाजारात विकण्याची परवानगी अशी या रहिवाशांची प्रमुख मागणी आहे.
नव्या विकास नियंत्रण नियमावलीत हा परिसर ‘एअरपोर्ट फनेलबाधित’ म्हणून घोषित करावा, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, स्थानिक आमदार पराग अळवणी यांनी त्यावेळी प्रयत्न केले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा विषय दुर्लक्षित राहिला आहे.
काय आहे विमानतळ फनेल?
सांताक्रूझ पूर्व-पश्चिम, विलेपार्ले पूर्व-पश्चिम, कुर्ला, घाटकोपर या उपनगरातील इमारतींना सांताक्रूझ आणि पवनहंस या विमानतळांचे फनेल झोन (विमानाचे उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गावरील परिसर) लागू आहेत. या फनेलमध्ये येणाऱ्या इमारतींच्या उंचीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियम लागू आहेत. दोन ते तीन मजल्यांपर्यंतच उंचीची मर्यादा असल्यामुळे या इमारतींना लागू करण्यात आलेल्या एक चटई क्षेत्रफळात या इमारतींचा पुनर्विकास होणे अशक्य आहे. या इमारती जीर्ण झाल्या असून काही मोडकळीसही आल्या आहेत. स्वखर्चाने इमारतींचा पुनर्विकास करण्याची ऐपत नाही, अशा स्थितीत हे रहिवासी भरडले गेले आहेत.