मुंबई : मध्य मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहू लागल्याने घरांच्या किमती कोटीवर पोहोचल्याने गेल्या अनेक वर्षांपासून अधिक काळ गावातील चाकरमान्यांचे आश्रयस्थान बनलेल्या ‘गाववाल्यांच्या खोल्या’ सध्या धोक्यात आल्या आहेत. ग्रामस्थ मंडळांनी आपल्या गावकऱ्यांसाठी मुंबईतील वास्तव्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या हजारो खोल्या विशिष्ट व्यक्तींच्या नावे आहेत. याचा फायदा उठवून यापैकी काही व्यक्तींनी या खोल्या विकण्याचा घाट घातला आहे. आतापर्यंत १४ ते १५ खोल्यांचा व्यवहार झाल्याचा अंदाज आहे. आता ग्रामस्थ मंडळेही सतर्क झाली असून त्यांनी हा डाव हाणून पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

६०-६५ वर्षांपूर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह  राज्याच्या अन्य भागातून अनेक गावकरी मुंबईत आले. गिरण्यांमध्ये ही मंडळी नोकरी करीत होती. परंतु राहायला घर नसल्याने त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. यातूनच ‘गाववाल्यांची खोली’ ही संकल्पना उदयास आली. वर्गणी काढून गाववाल्यांनी या खोल्या घेतल्या. या खोल्यांवर ग्रामस्थ मंडळांचे नियंत्रण राहू लागले. आजही मुंबई, ठाण्यात गाववाल्यांच्या अशा तीन ते चार हजार खोल्या असल्याचा दावा केला जातो. भायखळा, एन. एम. जोशी मार्ग, भिलाई रोड, वरळी, शिवडी, मानखुर्द, सायन, चेंबूर, ठाणे आदी परिसरात दहा बाय दहा किंवा दहा बाय पंधराच्या या खोल्यांमध्ये तब्बल २५ ते ३० लोक  गुण्यागोविंदाने राहात होते. मध्य मुंबईला सोन्याचा भाव आल्यानंतर या इमारतींमध्ये पुनर्विकासाचे वारे वाहू लागले. एक कोटीपर्यंत किंमत येऊ लागल्यानंतर ज्यांच्या नावावर या खोल्या आहेत त्यांनी काहीजणांना हाताशी धरून खोल्या परस्पर विकण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे १५ ते २० टक्के खोल्यांचे व्यवहार परस्पर झाल्याचा संशय सातारा जिल्ह्य़ातील जावळी तालुक्यातील मोरेवाडीचे माजी सरपंच नितीन दुदुस्कर यांनी व्यक्त केला आहे. या खोल्या तांत्रिकदृष्टय़ा कोणा एकाच्या नावावर असल्या तरी त्यांची मालकी मात्र संपूर्ण गावाची किंवा ग्रामस्थ मंडळाची आहे. त्यामुळे त्या विकता येणार नाहीत, असा पवित्रा आता ग्रामस्थ मंडळांनी घेतला आहे. मोरेवाडीच्या साईनाथ ग्रामस्थ मंडळाच्या अशाच दोन खोल्या भायखळ्याच्या बकरी अड्डा परिसरात आहेत. ट्रस्ट स्थापन करून या खोल्यांची देखभाल पाहिली जात होती. एक विश्वस्त असलेल्या व्यक्तीच्या नावे या खोल्या करण्यात आल्या. मात्र आता ही व्यक्ती या खोल्या विकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…

संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ग्रामस्थ मंडळाच्या खोल्या मुंबईत आहेत. या खोल्या विकल्यास चाकरमान्यांचे मुंबईतील अस्तित्वच नष्ट होईल. पुढच्या पिढीचा विचार होण्याची गरज आहे. आम्ही जनजागृती सुरू केली असून गावातही बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत खोल्या विकू देणार नाही.      नितीन दुदुस्कर, माजी सरपंच, मोरेवाडी (जावळी)