|| मंगल हनवते
मुख्यालयाच्या जागी १७ मजली चार इमारती

मुंबई : राज्यातील अत्यल्प गटापासून ते उच्च गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देणाऱ्या म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयाची, म्हाडा भवनाची इमारत जुनी आणि जीर्ण झाली असून लवकरच म्हाडा भवनाचा कायापालट होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुख्यालयाचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्यासाठी १२३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पाच एफएसआयचा वापर करत सध्याच्या पाच मजली इमारतीच्या जागेवर एकूण चार १७ मजली टॉवर बांधण्यात येणार आहेत.

परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने म्हाडाची स्थापना करण्यात आली. साधारण ५० वर्षांपूर्वी वांद्रे पूर्व येथील १९ हजार २०३ चौ मीटर जागेवर म्हाडा मुख्यालयाची इमारत बांधण्यात आली. पण आता मुख्यालयाची इमारत जीर्ण-जुनी झाली असून तिची डागडुजीही होण्यासारखी नाही. त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास करण्याची गरज निर्माण झाली असून मुंबई मंडळाने मुख्यालयाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार लवकरच म्हाडा मुख्यालयाचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘लोकसत्ता रियल इस्टेट कॉन्क्लेव्ह-२०२१’ दिली. सध्याचे मुख्यालय १९ हजार २०३ चौ मीटर जागेवर उभे असून आता पाच एफएसआयनुसार पुनर्विकास केला जाणार आहे. त्यानुसार ९६ हजार १९ चौ मीटर क्षेत्रफळ उपलब्ध होणार असून ३३ हजार ६०३ चौ मीटरचे क्षेत्रफळ फंजीबलच्या रूपात उपलब्ध होणार आहे. म्हणजेच पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाला १ लाख २९ हजार ६२६ चौ मीटर इतके क्षेत्रफळ मिळणार आहे.

पुनर्विकासानंतर मुख्यालयाच्या १७ मजली चार इमारती उभ्या ठाकणार आहेत. मुख्यालयाची सध्याची इमारत न पाडता, एकही कार्यालय न हलवता पुनर्विकास केला जाणार आहे. भवनात २ एकर जागा मोकळी असून याच जागेवर १७ मजली एक इमारत उभी राहिल्यावर तेथे मुख्यालय स्थलांतरित करण्यात येईल. त्यानंतर जुनी इमारत पाडून त्या जागी उर्वरित १७ मजली तीन इमारती बांधण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. या पुनर्विकासासाठी १२३० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून काम सुरू झाल्यापासून पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे.

म्हाडा भवनाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणासमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. सर्व सरकारी परवानग्या मिळाल्यानंतर बांधकामासाठी निविदा मागवत पुनर्विकास मार्गी लावला जाणार आहे. – योगेश म्हसे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ