scorecardresearch

रुग्णांचे हाल सुरूच!

राजेंद्र यांची बहीणही पोटाच्या आजाराच्या उपचारासाठी वाडिया रुग्णालयात आली आहे.

resident doctors strike , patients
डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये मंगळवारी असे चित्र होते.   (छायाचित्र : गणेश शिर्सेकर)

डॉक्टरांच्या संपामुळे बाह्य़रुग्ण विभाग बंद

धुळ्यातील डॉ. रोहित म्हामुणकर यांच्यावरील अमानुष हल्ल्यानंतर नाशिक, औरंगाबाद येथील निवासी डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे सर्वसामान्य रुग्णांना होत असलेला त्रास मंगळवारीही कायम होता. निवासी डॉक्टरांच्या सामूहिक काम बंद आंदोलनात शीव, केईएम, नायर या मुंबईतील प्रमुख रुग्णालयांतील निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता भासू लागली असून मंगळवारी पालिकेने बाह्य़रुग्ण विभाग पूर्णपणे बंद ठेवले. यामुळे मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांचे हाल झाले.

नांदेड येथे राहणारे राजेंद्र राहीने (३५) चार दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आले आहेत. मात्र शनिवारी रुग्णालयात खूप गर्दी असल्यामुळे त्यांची तपासणीच होऊ शकली नाही. तर दुसऱ्या दिवशी बाह्य़ रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे तपासणी होऊ शकली नाही. नांदेड येथे औषधांच्या दुकानात काम करणारे राजेंद्र यांचे मुंबईत नातेवाईक नसल्यामुळे ते पत्नीसोबत रुग्णालयाजवळील गाडगे महाराज संस्थेत राहत आहेत. डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याशिवाय त्यांना नोकरीवर रुजू होता येत नाही. ‘‘माझ्या डाव्या डोळ्यावर झापड आली आहे. त्यामुळे मला नीट दिसत नाही. यापूर्वी केईएममध्येच डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे मी नांदेडहून येथे आलो; पण गेले तीन दिवस माझी साधी तपासणी झाली नाही,’’ अशी खंत राजेंद्र यांनी व्यक्त केली. बाह्य़रुग्ण विभाग कधी सुरू होणार, याबाबत व्यवस्थापनाकडून काहीही माहिती दिली जात नसल्याची तक्रारही त्यांनी केली. राजेंद्र यांची बहीणही पोटाच्या आजाराच्या उपचारासाठी वाडिया रुग्णालयात आली आहे. मात्र, वाडिया रुग्णालयाने त्यांना केईएम रुग्णालयात पाठवले; परंतु केईएमचा बाह्य़रुग्ण विभाग बंद असल्याने त्यांनाही उपचार मिळू शकलेले नाहीत.

गेल्या आठवडय़ात केलेल्या थायरॉइड चाचणीचा अहवाल घेण्यासाठी नीला तांबे (५४) या विरारहून केईएम रुग्णालयात आल्या होत्या. मात्र चाचणी अहवाल मिळविण्यासाठी त्यांना दोन तास ताटकळत उभे राहावे लागले. अहवाल आल्याशिवाय पुढील तपासणी करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. हा अहवाल देणाऱ्या खिडकीबाहेर मंगळवारीही रुग्णांची गर्दी उसळली होती. चाचणी अहवाल देण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे अहवाल वाटपात विलंब होत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

शस्त्रक्रियांवरही परिणाम

केईएम रुग्णालयात सोमवार व मंगळवारी होणाऱ्या ५० शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद साळवे यांनी सांगितले, तर या दोन दिवसांत शीव रुग्णालयातील १०० हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. नायर रुग्णालयातील ५०० निवासी डॉक्टर कमी झाल्यामुळे उरलेल्या सुमारे २०० डॉक्टरांवर रुग्णालयाचा कारभार सांभाळणे अवघड होते. त्यामुळे उपस्थित सर्व डॉक्टर आपत्कालीन विभागातच काम करीत आहेत, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. जे.जे. रुग्णालयात सोमवारी नियोजित २२ शस्त्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आल्या, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2017 at 02:13 IST

संबंधित बातम्या