मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत उभारण्यात आलेल्या पुनर्वसित इमारतीमधील एका घरामागे वाहनतळातील एक जागा देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ना. म. जोशी मार्ग चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांनाही एका घरामागे वाहनतळातील एक जागा द्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा रहिवाशांनी केली आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतीत दोन घरामागे वाहनतळातील एक जागा याप्रमाणे बांधकाम करण्यात येत आहे. पण सर्व रहिवाशांना एका घरा मागे वाहनतळातील एक जागा देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतीत सर्व रहिवाशांसाठी तशी सोय करावी अशी मागणी ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीने केली आहे. या मागणीकडे म्हाडा आणि गृहनिर्माण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने पुढील आठवड्यात समितीकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातील लेखी निवेदन देण्यात येणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. दरम्यान, मुंबईत सर्वत्रच वाहनळाची समस्या गंभीर आहे. पुरेशी वाहनतळे उपलब्ध नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, पादचाऱ्यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेत बीडीडी चाळीत एका घरामागे वाहनतळातील एक जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पण मूळ आराखड्यानुसार तिन्ही ठिकाणी एका घरामागे वाहनतळातील एक जागा देण्यात आली होती. त्यामुळे तिन्ही ठिकाणच्या रहिवाशांनी एका घरामागे वाहनतळातील एक जागा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार म्हाडा, सरकारने वरळीसाठी ही मागणी मान्य करून येथील पुनर्वसित इमारतीत एका घरामागे वाहनतळातील एक जागा दिली आहे. मात्र त्याचवेळी ना. म. जोशी मार्ग आणि नायगावमधील पुनर्वसित इमारतीत दोन घरामागे वाहनतळातील एका जागेप्रमाणे पहिल्या टप्प्यात काम सुरू आहे. त्यामुळे ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या रहिवाशांनी पुन्हा एकदा एका घरामागे वाहनतळातील एक जागा देण्याची मागणी केली आहे. पुनर्वसित इमारतीचे बांधकाम सुरू झाले असून आता एका घरामागे वाहनतळातील एक जागा देता यणार नाही, असे यासंदर्भात विचारणा केल्यानंतर मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

वरळीत एका घरामागे वाहनतळातील एक जागा देता येते, मग आमच्या प्रकल्पात का नाही, असा प्रश्न समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केला आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू असले तरी अद्याप दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणे बाकी आहे. तेव्हा दुसऱ्या टप्प्यातील इमारतीच्या आराखड्यात बदल करून सर्व रहिवाशांना समावून घेण्याच्यादृष्टीने एका घरामागे वाहनतळातील एक जागा देणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हाडा आणि गृहनिर्माण विभाग या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने आता आम्ही पुढील आठवड्यात यासंबंधीचे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही नलगे यांनी सांगितले. गरज पडल्यास या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.