मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची तयारी सर्वत्र सुरू असतानाच राज्य सरकारच्या दुग्धविकास विभागातून सात महिन्यांपूर्वी निवृत्त झाल्यानंतरही निवृत्तीचे लाभ न मिळाल्याने हतबल झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्याने १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. मात्र उपोषणाचा इशारा दिल्यानंतरही दुग्धविकास विभागाला जाग आलेली नसून आपल्याशी अद्याप संपर्क साधण्यात आलेला नाही, अशी खंत या कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे.

दुग्धविकास आयुक्त कार्यालयात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेले विष्णू खळदकर ३० नोव्हेंबर २०२१ रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना हंगामी सेवा निवृत्ती वेतन मिळू लागले. मात्र त्याव्यतिरिक्त इतर सेवा निवृत्तीच्या लाभांपासून ते आजतागायत वंचित आहेत. सेवा निवृत्तीची सर्व लाभ मिळावे यासाठी शळदकर यांनी अनेक वेळा दुग्धविकास कार्यालयात खेटे घातले. परंतु त्यांच्या पदरी निराशा आली. अखेर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, राज्यपाल कार्यालय आणि वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवून सेवा निवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी दुग्धविकास आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

आपल्याविरुद्ध कोमतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. तसेच कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही. असे असतानाही हंगामी सेवा निवृत्त वेतनाखेरीच इतर सेवा निवृत्ती लाभापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी, १५ ऑगस्ट रोजी आपल्याला आमरण उपोषणाला बसावे लागत असल्याची खंत खळदकर यांनी व्यक्त केली आहे.

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी तिरंगा अभियानाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा या अभियानाच्या आयोजनात व्यस्त आहेत. तसेच नागरिकांमध्येही मोठा उत्साह दिसत आहे. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी सेवा निवृत्तीच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहावे लागलेल्या खळदकर यांना आमरण उपोषणाला बसण्याची वेळ ओढवली आहे.