मुंबई : पोलीस दलात पदोन्नती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:हून ती बहाल करण्याची पद्धत राज्य पोलीस दलात रुढ झाली आहे. आता सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांवर निधनानंतर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जावेत, यासाठी राज्य पोलिसांकडून कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. अशा पद्धतीची पहिल्यांदाच कार्यप्रणाली प्रसारित करण्यात आली असून ती राज्यभर राबविली जावी, अशी अपेक्षा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केली आहे.
पोलीस सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या त्या विभागात संबंधित पोलिसाला कुटुंबीयांच्या उपस्थितीत निरोप दिला जातो. मात्र त्यानंतर सेवानिवृत्त पोलिसाची खबर ठेवली जात नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू होतो तेव्हाही पोलीस दलाला फार क्वचित माहिती मिळते. आता सर्व पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरचा तपशील अद्ययावत ठेवण्याचे आदेश महासंचालकांनी दिले आहेत.
राज्यातील पोलीस आयुक्तालये, परिक्षेत्र कार्यालये, अधीक्षक कार्यालयांनी ही माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावा, असे नमूद केले आहे. वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती, वैद्यकीय कारणामुळे सेवानिवृत्त आणि सेवानिवृत्त किंवा निवृत्ती वेतनधारकाचे ओळखपत्र असलेल्या सर्व पोलिसांसाठी ही कार्यप्रणाली लागू आहे. मात्र आत्महत्या किंवा अपकीर्ती परिस्थितीमुळे मरण पावलेल्या पोलिसांना अशा पद्धतीने अंत्यसंस्काराच्या वेळी विशेष औपचारिकता प्राप्त होणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
या कार्यप्रणालीनुसार सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी कोणत्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गणवेशात हजर राहिले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. संबंधित पोलिसावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार व्हावेत, याची दक्षता संबंधित उपस्थित अधिकाऱ्याने घ्यावी, असेही स्पष्ट केले आहे.
बिगुल आणि शोक सलामी
मृत झालेला पोलीस अधिकारी महासंचालक दर्जाचा असल्यास ‘गार्ड ऑफ ऑनर’ (औपचारिक संचलनाशिवाय) देण्यात यावा. बिगुल आणि शोक सलामी प्रदान करावी, असे नमूद केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक वा त्यावरील दर्जाचे पोलीस अधिकारी असल्यास त्याबाबत पोलीस महासंचालक, राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, संबंधित पोलीस आयुक्त तसेच संबंधित परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षकांना माहिती द्यावी, असेही स्पष्ट केले आहे.
यांना उपस्थिती बंधनकारक…
सेवानिवृत्तीच्या वेळी पोलीस महासंचालक वा अतिरिक्त महासंचालक असलेल्या पोलिसाचा मृत्यू झाल्यास उपमहानिरीक्षक वा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्याने तर महानिरीक्षक वा उपमहानिरीक्षक असल्यास अधीक्षक किंवा त्यावरील दर्जाच्या, अधीक्षक वा अतिरिक्त अधीक्षक असल्यास उपअधीक्षक वा त्यावरील दर्जाचा तर पोलीस निरीक्षक वा त्याखालील सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार, शिपाई यांचा मृत्यू झाल्यास उपनिरीक्षक वा सहाय्यक उपनिरीक्षक यांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक केआले आहे.